भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे(बीसीसीआय) माजी अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांच्या इंडिया सिमेंट्स मालकीच्या आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघावर कोणत्याही इतर चौकशीविना बंदी घालायला हवी, असे कठोर मत सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी व्यक्त केले.
आयपीएल फिक्सिंग प्रकरणात गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यात न्यायालयाने बीसीसीआयला फटकारले. आयपीएलमधील नियमानुसार संघमालक कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतलेला आढळल्यास त्या संघाला अपात्र ठरवता येते. सर्वोच्च न्यायालयाने याच नियमावर बोट ठेवत चेन्नई सुपर किंग्जला अपात्र ठरवालया हवे असे सांगितले. ‘एवढा गोंधळ सुरु असतानाही तुम्ही चेन्नई सुपरकिंग्जला अपात्र का ठरवले नाही असा सवालही सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला यावेळी विचारला.
चेन्नई सुपरकिंग्स संघावर नेमके नियंत्रण कोणाचे आहे हे कळण्यासाठी इंडिया सिमेंट्‌स कंपनीमधील सर्व भागधारकांची सविस्तर माहितीही न्यायालयाने मागविली आहे. तसेच बीसीसीआयमध्ये पुन्हा निवडणुका होणे गरजेचे आहे, मात्र फिक्सिंग प्रकरणात ज्या मंडळींची नावे गुंतली आहेत, त्यांनी या निवडणुकांपासून लांब राहावे असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. बीसीसीआय अध्यक्ष व आयपीएलमधील एका संघाचे मालक अशी परस्पर हितविरोधी पदे स्वत:कडे ठेवलेल्या श्रीनिवासन यांना गेल्या आठवड्यामध्ये न्यायालयाच्या तीव्र रोषास सामोरे जावे लागले होते.