दहाव्या मानांकित कार्ला सुआरेजने इटालियन खुल्या टेनिस स्पध्रेतील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात मारिया शारापोव्हाला विजयासाठी चांगलेच झुंजवले. मात्र, अनुभवाची शिदोरी गाठीशी असलेल्या मारियाने दमदार पुनरागमन करून ४-६, ७-५,६-१ अशा फरकाने बाजी मारत तिसऱ्यांदा इटालियन खुल्या टेनिस स्पध्रेच्या जेतेपदावर नाव कोरले. पुरुष एकेरीत सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने स्वित्र्झलडच्या रॉजर फेडररवर ६-४, ६-३ असा सहज विजय मिळवत जेतेपद पटकावले.
प्रचंड उन्हात खेळताना मारियाला सुरुवातीला सुआरेजची सव्‍‌र्हिस भेदण्यात अडचण येत होती. त्यामुळेच सुआरेजने पहिला सेट ६-४ असा सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. यामध्ये मारियाने ७-५ अशी बाजी मारून सामना १-१ असा बरोबरीत आणला. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये मारियाने वर्चस्व राखताना हा सेट ६-१ असा फरकाने जिंकून दोन तास ३६ मिनिटांत जेतेपद पटकावले. क्ले कोर्टवरील या जेतेपदामुळे पुढील आठवडय़ात सुरू होणाऱ्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पध्रेत जेतेपद राखण्यासाठी तिचा आत्मविश्वास दुणावला आहे.  मारियाने यापूर्वी २०११ आणि २०१२ मध्ये इटालियन खुल्या टेनिस स्पध्रेचे जेतेपद पटकावले होते.
पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत जोकोव्हिचने पहिला सेट ६-४ असा सहज जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये फेडररने संघर्ष केला. ५-१ अशा आघाडीवर असलेल्या जोकोव्हिचला त्याने एका गुणासाठी चांगलेच झुंजवले. अखेर १ तास १५ मिनिटे चाललेल्या या लढतीत जोकोव्हिचने बाजी मारत तिसऱ्यांदा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. जोकोव्हिचने यापूर्वी २००८ आणि २०११ मध्ये या स्पर्धेत बाजी मारली होती. मात्र, फेडररला यंदाच्या सत्रात सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला.

अव्वल क्रमांकावर जोकोव्हिचची मजबूत पकड
पॅरिस : सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचने जागतिक  क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली पकड आणखी मजबूत केली आहे. सोमवारी जाहीर झालेल्या एटीपी गुणांकनात जोकोव्हिच १३८४५ गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान आहे. रविवारी जोकोव्हिचने इटालियन खुल्या टेनिस स्पध्रेत रॉजर फेडररला नमवून जेतेपद पटकावले होते आणि त्यामुळेच त्याच्या गुणांमध्ये भरघोस वाढ झाली. फेडरर ९२३५ गुणांसह दुसऱ्या, तर अँडी मरे ७०४० गुणांसह तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे.