जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचला कारकीर्दीत ग्रँड स्लॅम विजयाचे वर्तुळ पूर्ण करण्यासाठी आतुर आहे. दुसरीकडे दुखापती आणि ढासळता फॉर्म यांना टक्कर देत राफेल नदाल लाल मातीचा बालेकिल्ला सर करण्यासाठी उत्सुक आहे. हे दोघे मातब्बर खेळाडूं फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत समोरासमोर येण्याची शक्यता आहे. या स्पर्धेची मानांकने शुक्रवारी जाहीर झाली.
तंदुरुस्तीच्या अभावामुळे रॉजर फेडररने स्पर्धेतून माघार घेतल्याने अन्य खेळाडूंचा किमान उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जोकोव्हिचला अव्वल मानांकन देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच माद्रिद खुल्या स्पर्धेत जोकोव्हिचला नमवण्याची किमया करणाऱ्या अँडी मरेला द्वितीय मानांकन देण्यात आले आहे. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीत स्टॅनिसलॉस वॉवरिंका आणि अँडी मरे यांची गाठ पडण्याची शक्यता आहे. नदालची सलामीची लढत सॅम ग्रॉथशी होईल. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत त्याला जो विल्फ्रेंड सोंगाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
महिलांमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेली सेरेना विल्यम्स सलामीच्या लढतीत स्लोव्हाकियाच्या मॅगडलेना रायबरिकोव्हाशी खेळणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत सेरेना व व्हिक्टोरिया अझारेन्का यांच्यात लढत होऊ शकते.