मध्य प्रदेशविरुद्ध विजयाचा श्रीगणेशा केल्यानंतर आता गुजरातविरुद्ध नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणाऱ्या अखेरच्या साखळी लढतीत मुंबई संघासमोर ‘करो या मरो’ अशी स्थिती आहे. उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी मुंबईला किमान या सामन्यात तीन गुणांची कमाई करावी लागणार आहे. बरेच संघ बाद फेरीत स्थान मिळवण्यासाठी उत्सुक असले तरी फक्त पंजाब आणि उत्तर प्रदेश या संघांनी बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे.
मध्य प्रदेशविरुद्ध निसटत्या विजयाची नोंद करणाऱ्या मुंबईने या मोसमातील पहिला विजय मिळवला. त्यामुळे मुंबईने बाद फेरीतील आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. मुंबई संघ ‘अ’ गटात २० गुणांसह चौथ्या स्थानी असून गुजरातने २१ गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे गुजरातला मागे टाकण्यासाठी मुंबईला किमान पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर तीन गुणांची कमाई करावी लागणार आहे. तसे झाल्यास, मुंबईचे २३ आणि गुजरातचे २२ गुण होतील. मात्र एक गुण मिळवल्यास मुंबईचे बाद फेरीतील आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेशविरुद्ध मुंबईने निसटता विजय मिळवून सहा गुणांची कमाई केली ती झहीर खान आणि अभिषेक नायर यांच्या सुरेख गोलंदाजीमुळे. मध्य प्रदेशसमोर विजयासाठी ३१० धावांचे उद्दिष्ट ठेवल्यानंतर तळाचे फलंदाज आनंद राजन आणि ईश्वर पांडे यांनी अखेरच्या विकेटसाठी ३६ धावांची भागीदारी रचत मुंबईला विजयासाठी झुंजवले. अखेर नायरने पांडेचा अडसर दूर करत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पहिल्या डावात कौस्तुभ पवारने नाबाद शतकी खेळी साकारली होती. एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करलेल्या सचिन तेंडुलकरने गुजरातविरुद्धच्या सामन्यात खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सचिन आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीत वासिम जाफर, अभिषेक नायर, झहीर खान या अनुभवी खेळाडूंना मोलाचे योगदान द्यावे लागणार आहे.