भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सोमवारी कटक येथे झालेल्या ट्वेन्टी-२० सामन्यादरम्यान प्रेक्षकांनी केलेल्या हुल्लडबाजीवर माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कटक येथील बाराबती स्टेडियमवर पुढील दोन वर्षे सामनाच आयोजित केला जाऊ नये, असे रोखठोख मत सुनील गावसकर यांनी मांडले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱया ट्वेन्टी-२० सामन्यात भारताचा लाजीरवाणा पराभव झाल्यानंतर चिडलेल्या प्रेक्षकांनी मैदानावर बाटल्या फेकून हुल्लडबाजी केल्याने सामन्याला गालबोट लागले. प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे सामना दोन वेळा थांबवावा लागला. जवळपास निम्मे स्टेडियम रिकामे झाल्यानंतर उर्वरित खेळ पूर्ण करण्यात आला. या प्रकारामुळे तब्बल तासाभराचा खेळ वाया गेला. अखेर खेळ सुरू झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने सहजपणे लक्ष्य गाठत मालिकेवर कब्जा केला.
याप्रकरणावर गावसकर यांनी नाराजी व्यक्त करीत पुढील दोन वर्षे तरी या स्टेडियमवर कोणताही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आयोजित केला जाऊ नये, असा सल्ला दिला आहे. तसेच दंड म्हणून बीसीसीआयने ओडिशा क्रिकेट संघटनेच्या मानधनातही कपात करावी, असेही गावसकर यांनी सुचविले आहे.