सध्याच्या परिस्थितीत परदेशी संघांना क्रिकेट खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये बोलवू नये, असे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने म्हटले आहे. पाकिस्तानमधील सुरक्षाव्यवस्थेची सध्याची स्थिती पाहता शोएबने पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) हा सल्ला दिला आहे. काही दिवसांपूर्वीच क्वेट्टा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ६० जण मारले गेले होते. त्यामुळे देशातील सध्याची सुरक्षेची परिस्थिती फारशी चांगली नसल्याचे मत अख्तरने व्यक्त केले.

या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाकिस्तानमध्ये श्रीलंका संघावर झालेल्या हल्ल्यानंतर एकही परदेशी संघ पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिकेसाठी गेलेला नाही. आता अख्तरनेही याच कारणामुळे परदेशी संघांना निमंत्रण न देण्याचे आवाहन पीसीबीला केले आहे.
देशात सुरक्षेची परिस्थिती पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत आपण कोणत्याही संघाला बोलाविण्याचा धोका पत्कारू शकत नाही. मला आशा आहे, की पाकिस्तानमध्ये लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले जाईल. पण, त्यासाठी काही वेळ जाईल, असे अख्तरने जिओ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.