उत्तेजक द्रव्यांचे सेवन करणे म्हणजे कर्करोगासारखा आजार ओढवून घेण्यासारखेच आहे. शासनाने उत्तेजक प्रतिबंधाकरिता ठोस पावले उचलली पाहिजेत, असे ज्येष्ठ ऑलिम्पिक धावपटू मिल्खा सिंग यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘‘जर आपण खेळाडूंच्या खोलीत किंवा स्नानगृहात गेलो तर तेथे हमखास उत्तेजक औषधांच्या सीरिंज सापडतात. उत्तेजक औषध सेवनामुळे आपल्या शरीरातील ऊर्जा वाढते अशी भ्रामक कल्पना ते करीत असतात. मात्र अशा औषधांचा भविष्यात आपल्या शरीरावर अनिष्ट परिणाम होत असतो, हे या खेळाडूंना माहीत नसते. खेळाडूंना अशा अनिष्ट मार्गाकडे वळवणाऱ्या प्रशिक्षक व वैद्यकीय तज्ज्ञांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. पालकांनीही याबाबत सतर्क राहण्याची गरज आहे.’’