ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा, मनु अत्री-बी सुमिथ रेड्डी, श्लोक रामचंद्रन-सन्यम शुक्ला या जोडय़ांची सध्याची कामगिरी पाहता भारतात दुहेरी बॅडमिंटनसाठी चांगले चित्र निर्माण झाले आहे. या खेळाडूंनी नुकत्याच पार पडलेल्या अमेरिकन खुल्या ग्रां. प्री. सुवर्ण आणि मॉरिशस आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पध्रेत दमदार कामगिरी केली आहे.
मनु आणि सुमिथ या जोडीला अमेरिकन ओपन स्पध्रेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते, तर त्याआधी त्यांनी लेगॉस खुल्या स्पध्रेचे जेतेपद पटकावून अव्वल २० खेळाडूंमध्ये स्थान निश्चित केले होते. दुसरीकडे श्लोक व सन्यम यांनीही मॉरिशस स्पध्रेत बाजी मारून पहिल्यावहिल्या जेतेपदावर नाव कोरले होते. २०१०च्या राष्ट्रकुल स्पध्रेतील विजेत्या ज्वाला आणि अश्विनी ही जोडीही पुन्हा लयात आली आहे. त्यांनी जूनमध्ये कॅनडा खुल्या स्पध्रेचे जेतेपद पटकावले होते.
‘‘जानेवारीत पार पडलेल्या सय्यद मोदी स्पध्रेत अंतिम फेरीत धडक मारणारी मनीषा आणि मनु ही जोडी आमच्याकडे आहे, तसेच सिक्की व प्रज्ञा गद्रे यांनीही श्रीलंका आणि पोलीश खुल्या स्पध्रेत चांगली कामगिरी केली होती. पुरुष दुहेरीत आमच्याकडे दोन जोडी आहेत आणि ते सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत. ज्वाला व अश्विनी जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानावर आहे. त्यामुळे दुहेरी बॅडमिंटनपटूंसाठी ही दिलासादायक बाब आहे,’’ असे मत माजी खेळाडू पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केले.