‘चांगली सुरुवात म्हणजे निम्मे काम फत्ते’ या उक्तीला भारतीय संघ जागला नाही. भुवनेश्वर कुमारच्या सहा बळींच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंडला ३१९ धावांतच रोखले. यजमानांना केवळ २४ धावांची अल्प आघाडी मिळाली. दुसऱ्या सत्रात शिखर धवनला गमावल्यानंतर मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराने ७८ धावांची संयमी भागीदारी करत भारताच्या दुसऱ्या डावाला आकार दिला. मात्र तिसऱ्या सत्रात १९ चेंडूत ५ धावांच्या मोबदल्यात पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे तंबूत परतल्याने भारतीय संघाची घसरगुंडी उडाली. खेळपट्टीवर ठाण मांडणाऱ्या मुरली विजयने कर्णधार महेंद्र सिंग धोनीला साथीला घेत पडझड थोपवली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या ४ बाद १६९ धावा झाल्या असून त्यांच्याकडे १४५ धावांची आघाडी आहे. भारताची फलंदाजी कोलमडल्यामुळे ही कसोटी निर्णायक होण्याची चिन्हे दिसत आहेत.
तत्पूर्वी, ६ बाद २१९ वरून पुढे खेळणाऱ्या इंग्लंडच्या संघाने शंभर धावांची भर घातली. लियाम प्लंकेटने ५५ धावांची खेळी केल्याने इंग्लंडला तीनशे धावांचा टप्पा ओलांडता आला. भुवनेश्वर कुमारने ८२ धावांत ६ बळी घेतले. भारतीय गोलंदाजातर्फे लॉर्ड्सवरचे हे दुसरे सर्वोत्तम प्रदर्शन ठरले. याआधी लॉर्ड्सवर भारताकडून १९३६ मध्ये अमरसिंग यांनी ३५ धावांत सहा बळी घेतले होते. इंग्लंड संघाला २४ धावांची नाममात्र आघाडी मिळाली.
दुसऱ्या डावात शिखर धवन आणि मुरली विजय जोडीने ४० धावांची सलामी दिली. मात्र यानंतर बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. त्याने ३१ धावा केल्या. विजय-पुजारा जोडीने संयमी भागीदारी करत डाव सावरला. मात्र लियाम प्लंकेटने चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीला एकाच षटकांत बाद करत भारताला अडचणीत टाकले. पुजारा मॅट प्रॉयरकडे झेल देऊन बाद झाला तर कोहलीने उजव्या यष्टीबाहेरचा चेंडू सोडला मात्र तो थेट यष्टींवर जाऊन आदळला. पुजाराने ४३ धावा केल्या तर कोहलीला भोपळाही फोडता आला नाही. काही मिनिटांतच पहिल्या डाव्यातील शतकवीर अजिंक्य रहाणे पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा बळी ठरला. स्टुअर्ट ब्रॉडचा चेंडू अजिंक्यच्या आर्मगार्डला लागून प्रॉयरच्या हातात विसावला. ३ बाद १२३ अशा अवस्थेतून विजय-धोनी जोडीने ४६ धावांची भागीदारी करत डाव सावरला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विजय ५९ धावांवर तर धोनी १२ धावांवर खेळत आहेत.
संक्षिप्त धावफलक
भारत : पहिला डाव : सर्वबाद २९५.
इंग्लंड : पहिला डाव : सर्वबाद ३१९.
भारत : दुसरा डाव : ६३ षटकांत ४ बाद १६९ (मुरली विजय खेळत आहे ५९, चेतश्वर पुजारा झे. प्रॉयर गो. प्लंकेट ४३, शिखर धवन ३१; लियाम प्लंकेट २/२४, बेन स्टोक्स १/३५)