९ डिसेंबरपासून बेहाला फ्लाइंग क्लबमध्ये शर्यत

वेगाशी शर्यत करण्याची आवड असणाऱ्या शर्यतपटूंना येत्या डिसेंबर महिन्यात वेगाचा थरार अनुभवता येणार आहे. युरोप आणि अमेरिकेत प्रसिद्ध असलेल्या ‘ड्रॅग रेसिंग’ या मोटार आणि मोटारसायकल शर्यतीचा ‘याची देही, याची डोळा’ आनंद लुटण्याची संधी कोलकातातील चाहत्यांना येत्या डिसेंबर महिन्यात मिळणार आहे.

भारतीय मोटर स्पोर्ट्स महासंघाच्या मान्यतेने आणि एलिट ऑक्टान यांच्यावतीने ‘इंडिया स्पीड विक’ या ड्रॅग शर्यतीचे आयोजन करण्यात आले आले आहे. ९ ते ११ डिसेंबर या कालावधीत येथील बेहाला फ्लाइंग क्लबमधे या शर्यती पार पडणार आहे. कोलकातात पहिल्यांदाच अशा शर्यतीचे आयोजन होत आहे.

भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायच्युंग भुतियाच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी या शर्यतीची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी इंडिया स्पीड विकचे अध्यक्ष अमित मोदी, एलिट ऑक्टानचे प्रामुख रोंगोम टागोर मुखर्जी यांच्यासह मोटर स्पोर्ट्स महासंघाचे सदस्य उपस्थित होते. जानेवारीमध्ये होणाऱ्या या स्पध्रेला पश्चिम बंगाल सरकारकडून मान्यता न मिळाल्यामुळे विलंब झाला. अखेरीस सर्व अडथळ्यांवर मात केल्यानंतर आयोजकांना स्पध्रेसाठी परवानगी मिळवण्यात यश आले.

‘‘या स्पध्रेची घोषणा करताना अत्यानंद होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पीड विकमध्ये ड्रॅग रेसिंग शर्यतीच्या थरारासह ऑटो एक्झबिशन, साहसी क्रीडा यांचाही आनंद क्रीडाप्रेमींना घेता येणार आहे,’’ असे अमित मोदी यांनी सांगितले.

ड्रॅग रेसिंगम्हणजे काय ?

एका वेळी दोन मोटार किंवा मोटारसायकल यांच्यात एक किलोमीटपर्यंत ही शर्यत घेतली जाते. यामध्ये पहिला येणारा शर्यतपटू पुढील फेरीत पात्र होतो आणि पराभूत स्पध्रेबाहेर होतो. मोटार आणि मोटारसायकल यांची विविध इंजिन क्षमतेनुसार गटांत विभागणी करण्यात येते.

कोलकाता येथे ही स्पर्धा होत असल्याचा आनंद होत आहे. आयोजकांनी संधी दिल्यास मलाही शर्यतीत सहभाग घ्यायला आवडेल. बायच्युंग भुतिया, भारताचा माजी फुटबॉल कर्णधार