भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) भारतीय हॉकी संघाच्या विमान प्रवासाचा खर्च उचलण्यास नकार दिल्यामुळे पाच वेळा विजेता ठरलेल्या भारताने पुढील महिन्यात होणाऱ्या प्रतिष्ठेच्या अझलन शाह हॉकी चषक स्पर्धेतून माघार घेतली आहे, असा दावा हॉकी इंडियाने केला आहे. ही बातमी जाहीर होताच, भारतीय संघाला हा निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश क्रीडा मंत्रालयाने ‘साई’ला दिले आहेत. क्रीडा मंत्रालयाच्या सहकार्याच्या भूमिकेमुळे भारताचा या स्पर्धेतील सहभागाचा मार्ग मोकळा झाला असला, तरी या स्पर्धेतून आधीच माघार घेतल्यामुळे या घडामोडीनंतर हॉकी इंडियाने अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
गोंधळाची परिस्थिती दूर करण्यासाठी आम्ही लवकरच योग्य तो निर्णय घेणार आहोत, असे हॉकी इंडियाकडून स्पष्ट करण्यात आले. इपोह, मलेशिया येथे ९ ते १७ मार्चदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेतून भारताने माघार घेतल्यानंतर क्रीडा सचिव पी. के. देब यांनी हस्तक्षेप केला. ‘‘क्रीडा मंत्रालयाने निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश ‘साई’ला दिले आहेत. अझलन शाह ही महत्त्वाची स्पर्धा असून प्रतिष्ठेच्या या स्पर्धेत खेळण्याची खेळाडूंची संधी वाया जाऊ नये, यासाठीच मी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला. खेळाडूंच्या भल्यासाठी आम्ही हॉकी इंडियाला निधी उपलब्ध करून देण्याचे ठरवले,’’ असे देब यांनी सांगितले.
भविष्यात हॉकी इंडियावर स्पर्धाना मुकण्याची वेळ येईल का, याबाबत विचारले असता देब म्हणाले, ‘‘साईकडून मिळणाऱ्या निधीचा वापर करताना हॉकी इंडियाने सावधानता आणि शिस्त बाळगायला हवी. हॉकी इंडियाला वर्षांसाठी ५.९४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पण त्यांचा वर्षांचा खर्च ११.२७ कोटी रुपये इतका झाला आहे. मंजूर झालेल्या रकमेच्या दुप्पट खर्च त्यांनी केला आहे. खर्च करण्याच्या बाबतीत अनेक वेळा ‘साई’ने त्यांची कानउघडणी केली आहे. या वेळी आम्ही त्यांना निधी उपलब्ध करून दिला आहे, पण प्रत्येक वेळी असे होईलच असे नाही.’’
भारतीय हॉकी संघाचा वाढता खर्च पाहता, ‘साई’चे महासंचालक गोपाळ कृष्णन यांनी भारतीय संघाच्या विमान प्रवासाचा खर्च उचलण्यास नकार दिला होता. त्यामुळे अझलन शाह हॉकी स्पर्धेतून भारताने माघार घेतली होती. या घटनेमुळे खेळाडूंचे मनोधैर्य खचले आहे. सरकारला फक्त विमान प्रवासाचा भार उचलायचा आहे. तिथे राहण्याचा, खाण्याचा आणि अन्य खर्च संयोजकांमार्फत केला जाणार आहे, असे हॉकी इंडियाच्या पत्रकात म्हटले होते. भारताने १९८५, १९९१, १९९५, २००९ आणि २०१०मध्ये या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. गेल्या वेळच्या स्पर्धेत भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते.