आगामी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पदक मिळविण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा विकास निधीमार्फत साहाय्य केले जाणार आहे. त्यासाठी निवड समितीत ज्येष्ठ क्रिकेटपटू राहुल द्रविड, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा, ज्येष्ठ बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांचा समावेश आहे.
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने मिशन ऑलिम्पिक योजना सुरू करण्याचे ठरविले आहे. रिओ (२०१६) व टोकियो (२०२०) येथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी पदक मिळविण्याची क्षमता असणाऱ्या विविध खेळांमधील खेळाडूंची निवड केली जाणार आहे. भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे सदस्य अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे सरसंचालक, क्रीडा मंत्रालयाचे सहसचिव, मित्तल चॅम्पियन्स ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा मल्होत्रा यांचाही समावेश आहे. अमृत माथूर हे या समितीचे निमंत्रक असतील. ही समिती पदक मिळविण्याची क्षमता असलेल्या ७५ ते १०० खेळाडूंची निवड करणार आहे. त्यांना प्रशिक्षणासाठी सर्वतोपरी साहाय्य केले जाईल. प्रामुख्याने अ‍ॅथलेटिक्स, तिरंदाजी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, कुस्ती व नेमबाजी या खेळांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.