कोलकाता कसोटी सामन्यात भारतीय संघाने सपशेल शरणागती पत्करली. त्यामुळे देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंचे कौशल्य, क्षमता आणि गुणवत्ता यांच्यापुढे प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतो, अशा शब्दांत भारताचा माजी कप्तान राहुल द्रविडने टीका केली.
‘‘लोक प्रवृत्तीप्रमाणेच बोलतात की खेळाडूंना कसलीच चिंता नसते, ते फक्त इंडियन प्रीमियर लीगमध्ये मिळणाऱ्या पैशामागेच धावतात. ही फक्त नाण्याची एक बाजू आहे. पण मुख्य म्हणजे खेळाडूंमध्ये कौशल्य आणि क्षमतेचाच अभाव जाणवतो आहे आणि हे अधिक चिंताजनक आहे. त्यामुळेच खेळाडूंची गुणवत्ता आणि दर्जा यांच्यापुढे प्रश्नचिन्ह उपस्थित होणे स्वाभाविक आहे,’’ असे द्रविडने ‘बीबीसी कसोटी सामना विशेष’मध्ये सांगितले. ‘‘देशातील स्थानिक क्रिकेट खेळाडूला आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ देण्याइतपत दर्जेदार नाही, हे भारतातील महत्त्वाचे आव्हान आहे,’’ असे तो पुढे म्हणाला.
‘‘भारत हरला म्हणून नव्हे तर ज्या पद्धतीने हरलो ते पाहून अनेक क्रिकेटरसिकांची घोर निराशा झाली. भारताने तिन्ही सामन्यांत नाणेफेकीचा कौल जिंकला होता. मुंबईतील खेळपट्टी तर पूर्णत: अनुकूल होती, कोलकात्यामध्ये फलंदाजीला पोषक वातावरण होते. परंतु भारतीय संघाला त्याचा फायदा उचलता आला नाही किंवा तितक्या आत्मविश्वासाने आपण प्रतिकार केला नाही,’’ असे द्रविड म्हणाला. या वर्षी मार्च महिन्यात द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
‘‘भारत अ संघाचे दौरे वाढविण्याची आणि अकादमी पद्धती राबविण्याची देशात आवश्यकता आहे. इंग्लिश संघ त्या पद्धतीनेच विचार करतो. हिवाळ्याच्या मोसमात हा संघा जगातील विविध देशांचे दौरे करतो. भारताने इंग्लंडकडून काही गोष्टी शिकायला हव्यात,’’ असे द्रविडने सांगितले.