* महिला विश्वचषकाची अंतिम फेरी आज रंगणार
* सहाव्यांदा विश्वचषकाला गवसणी घालण्यासाठी ऑस्ट्रेलिया सज्ज
* ऐतिहासिक विजयासाठी वेस्ट इंडिज आतूर
ज्या क्षणाची सारेच आतुरतेने वाट पाहात होते, तो क्षण समोर येऊन उभा ठाकला आहे.. काही दिवसांपूर्वी आठ संघांनी विश्वविजयाचे स्वप्न पाहिले खरे, पण ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या दोन संघांनाच अंतिम फेरी गाठता आली.. या दोन्ही संघांत रविवारी विश्वविजयाचा अंतिम सामना रंगणार असून ऑस्ट्रेलियाचा संघ सहाव्या विश्वचषकाला गवसणी घालतो की पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचलेला वेस्ट इंडिजचा संघ इतिहास रचतो, याची उत्सुकता साऱ्यांनाच असेल. ‘सुपर सिक्स’मध्ये वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत सर्वानाच जोरदार धक्का दिला होता. त्यामुळे अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया पराभवाचा वचपा काढणार की वेस्ट इंडिज ‘बेस्ट इंडिज’ असल्याचे दाखवून देणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागलेले असेल.
ऑस्ट्रेलियाला स्पर्धेत अजूनपर्यंत चांगली सलामी मिळालेली नाही. मेग लॅनिंग आणि राचेल हायेन्स यांना अजूनही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याचबरोबर मधल्या फळीलाही कामगिरीत सातत्य दाखवता आलेले नाही, पण गोलंदाजीच्या जिवावर त्यांनी सामने जिंकलेले आहेत. मेगान शटने सामन्यात सर्वाधिक १३ बळी मिळवलेले आहेत. त्याचबरोबर जोडी फिल्ड, होली फर्लिग यांनी चांगला मारा केला आहे. लिसा स्थळेकरसारखी अनुभवी अष्टपैलू खेळाडू त्यांच्याकडे आहे. गेल्या तीन सामन्यांमध्ये इलिस पेरीला त्यांनी खेळवलेले नाही, अंतिम फेरीच्या सामन्यात तिला खेळवून वेस्ट इंडिजला धक्का देण्याची रणनीती ऑस्ट्रेलियाने आखली असेल.
वेस्ट इंडिजच्या संघाचा कोणताही भरवसा नाही, असेच चित्र आहे. कारण विश्वचषकातील पहिला सामना त्यांनी गमावला होता, पण स्पर्धा जशी वाढत गेली तसे विजयही त्यांच्या पदरात पडत गेले, त्यामुळे अंतिम फेरीत ते ऑस्ट्रेलियाला धक्का देणार का, याकडेच साऱ्यांचे लक्ष असेल. डीएन्ड्रा डॉटीन हे संघाचे ट्रम्प कार्ड आहे. तडफदार फलंदाजीच्या जोरावर तिने एकहाती संघाला विजय मिळवून दिले आहे. वेगवान गोलंदाजीची धुरा या वेळी श्ॉनेल डेली आणि ट्रेमायने स्मार्ट यांनी यशस्वीरीत्या सांभाळलेली आहे. त्याचबरोबर अनिसा मोहम्मदसारखी भेदक फिरकीपटू त्यांच्या संघात आहे.