ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविणे, हे एक जबरदस्त आव्हान असले तरी हे लक्ष्य साध्य करण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करणार आहे व त्यामध्ये मी यशस्वी होईन असा आत्मविश्वास वेटलिफ्टर ओंकार ओतारी याने व्यक्त केला आहे. ओंकारने नागपूर येथे नुकत्याच झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. रेल्वे संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ओंकारची आगामी राष्ट्रकुल क्रीडा, आशियाई क्रीडा स्पर्धासाठी भारताच्या संभाव्य संघात निवड झाली आहे. कुरुंदवाड येथील या खेळाडूने आतापर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आपल्या कारकिर्दीविषयी त्याने केलेली बातचीत-
वेटलिफ्टिंगसारख्या अवघड खेळातच कारकीर्द का करावीशी वाटली?
माझा भाऊ पंकज हा वेटलिफ्टिंग स्पर्धामध्ये भाग घेत असे. त्याला या खेळात कारकीर्द करता आली नाही. मात्र त्याने मिळविलेले यश पाहून मलाही या खेळातच कारकीर्द करण्याची इच्छा झाली. सुदैवाने मला घरच्यांकडून भरपूर पाठबळ मिळाले. विशेषत: माझी या खेळातील प्रगती पाहून माझ्या आईने मला याच खेळात कारकीर्द करण्यासाठी प्रोत्साहन दिले. माझ्या भावाकडून या खेळाचे बाळकडू लाभले. त्यानंतर प्रदीप पाटील यांच्याकडून मला या खेळासाठी मार्गदर्शन लाभले आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पदक मिळविण्यासाठी नेमके कोणते तंत्र उपयोगात आणायचे हे त्यांनी मला शिकविले आहे. माझी पत्नी नम्रता ही अ‍ॅथलेट असल्यामुळे तिचेही सतत मानसिक पाठबळ मला लाभत असते.
राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची खात्री होती का?
अर्थातच. या स्पर्धेसाठी मी भरपूर सराव केला होता. स्पर्धेत तुल्यबळ प्रतिस्पर्धी होते तरीही माझा यापूर्वीचा अनुभव मला फायदेशीर ठरला. आपले प्रतिस्पर्धी कोण आहेत याचा फारसा विचार न करता मी फक्त माझ्या कामगिरीवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळेच मला तेथे दोन सुवर्णपदकांना गवसणी घालता आली.
यंदा तुला बऱ्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भाग घेण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी काय तयारी करीत आहे?
यंदाचे वर्ष माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. राष्ट्रकुल, आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धा, जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आदी अनेक  स्पर्धामध्ये मला भाग घेण्याची संधी मिळणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत प्रामुख्याने मलेशियन खेळाडूंचे आव्हान असणार आहे तर आशियाई स्पर्धेत प्रामुख्याने चीनच्या वेटलिफ्टर्सशी लढत द्यावी लागणार आहे. जागतिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंना खडतर आव्हानाला सामोरे जावे लागते. या सर्वच आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी मी कठोर परिश्रम करीत आहे. यापूर्वी मी दक्षिण आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक तर राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक मिळविले आहे. या आंतरराष्ट्रीय स्पर्धामधील अनुभवाचा फायदा मला आगामी स्पर्धामध्ये निश्चित मिळणार आहे.
रेल्वेत नोकरी करताना तुला काय सुविधा मिळत आहेत?
वेगवेगळ्या स्पर्धामध्ये भाग घेताना लागणाऱ्या सर्व सुविधा आम्हाला रेल्वेकडून मिळतात. कोणत्याही राष्ट्रीय स्पर्धेत आम्ही रेल्वेचेच प्रतिनिधित्व करीत असल्यामुळे आम्हाला चांगल्या सवलती मिळतात. प्रामुख्याने आर्थिक चिंता नसल्यामुळे आम्ही निश्चिंत मनाने स्पर्धेत भाग घेऊ शकतो.
भारतीय खेळाडूंना परदेशी प्रशिक्षकांचा फायदा होऊ शकेल काय?
होय. यापूर्वी आम्हाला आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी सराव करताना हंगेरियन प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली होती. जागतिक स्तरावरील स्पर्धामध्ये भाग घेताना वजन उचलण्यासाठी कोणते तंत्र उपयोगात आणले पाहिजे याबाबत परदेशी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचा फायदा मिळू शकतो.
वेटलिफ्टिंग व उत्तेजकांचे अतूट नाते आहे, याविषयी काय मत आहे?
आजपर्यंत मी कधीही या वाईट मार्गाकडे गेलेलो नाही. उत्तेजक औषधे सेवनामुळे आपल्या देशातील अनेक खेळाडूंचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. हे लक्षात घेऊनच मी कायमच या अपप्रवृतींना विरोध दर्शविला आहे. एक वेळ पदक मिळाले नाही तरी चालेल पण अशा वाममार्गाना मी कधीही जाणार नाही.
नवोदित खेळाडूंनी या खेळात कारकीर्द करावी काय?
हो, निश्चितच. या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळविण्याच्या भरपूर संधी उपलब्ध असतात हे लक्षात घेऊनच मी नवोदित खेळाडूंनी या खेळात कारकीर्द करावी असा सल्ला आवश्य देईन.