सलोख्याचा मार्ग खेळाच्या मैदानातून जातो, असे म्हटले जाते. काही देशांच्या बाबतीत तसे बऱ्याचदा घडलेही. भारतानेही अलीकडे पुन्हा एकदा एक पाऊल पुढे टाकत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी खेळाच्या मार्गातून संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले. दोन्ही देशांमध्ये आलबेल सुरू असताना पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताविरोधात सीमेवर कारवाया सुरू केल्या. त्यामुळे देशवासीयांचा रोष स्वाभाविकच होता. देशातील तणावग्रस्त परिस्थिती लक्षात घेऊन हॉकी इंडिया लीगसाठी भारतात आलेल्या नऊ पाकिस्तानी खेळाडूंना त्यांच्या देशात परत पाठवण्याचा निर्णय हॉकी इंडियाने घेतला. त्यानंतर महिला विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या भारतातील सामन्यांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे खेळाच्या मैदानातून जाणाऱ्या सलोख्याच्या मार्गात तूर्तास तरी बरेच अडथळे निर्माण झाले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने म्हणजे युद्धच.. क्रीडारसिकांसाठी अनोखी पर्वणी. पण हे युद्ध मैदानावर रंगत असल्यामुळे त्यातून दोन्ही देशातील चाहत्यांना आनंदच लुटता येतो. २००८मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट जवळपास संपुष्टात आले होते. ३ मार्च २००९मध्ये लाहोर येथील गडाफी स्टेडियमच्या आवारात श्रीलंकन क्रिकेटपटूंवर झालेल्या हल्ल्यानंतर कोणताही संघ पाकिस्तानात जाण्यास धजावत नाही. सुरक्षेच्या कारणास्तव २०११ आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचे पाकिस्तानातील सामनेही रद्द करण्यात आले. पण ‘अमन की आशा’ असा कांगावा करणाऱ्या पाकिस्तानला भारताने क्रिकेट मालिकेसाठी आमंत्रित केले. या मालिकेला चाहत्यांनी अपेक्षेप्रमाणेच भरभरून प्रतिसाद दिला. पाकिस्तानातील क्रिकेट जवळपास संपुष्टात आल्याने त्यांना अन्य देशांविरुद्ध सामने खेळण्यासाठी दुबई किंवा अन्य त्रयस्थ ठिकाणांचा सहारा घ्यावा लागत आहे. भारताविरुद्धची क्रिकेट मालिका ही भारतासाठी नवसंजीवनी देणारी होती. कारण भारताविरुद्धच्या मालिकेतून मिळणारा नफा हा अन्य देशांविरुद्धच्या मालिकांपेक्षा कैकपटीने जास्त असतो, याची जाणीव पाकिस्तानला आहे.अलीकडेच हॉकी इंडिया लीगसाठी पाकिस्तानच्या खेळाडूंना भारताने व्हिसा दिला. पाकिस्तानचे खेळाडू भारतातही दाखल झाले. पण सीमीरेषेवरील तणावग्रस्त परिस्थितीमुळे पाकिस्तानी खेळाडूंना मायदेशी परतावे लागले आहे. पण परतपाठवणी करताना पाकिस्तानी खेळाडूंना कराराची संपूर्ण रक्कम देण्यात येईल, ही उदार भूमिका हॉकी इंडियाने घेऊन चांगला आदर्श सर्वासमोर ठेवला आहे. खरे तर पाकिस्तानचा हॉकी संघ हा भारतापेक्षा नक्कीच सरस आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाला पाकिस्तानने बऱ्याच वेळा पराभूत केले आहे. पाकिस्तानच्या खेळाडूंची कामगिरीही चांगली होत आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर चाहत्यांनी हजेरी लावली असती, हे नक्की. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या हॉकीपटूंसह खेळताना भारताच्या युवा खेळाडूंनाही त्यांच्याकडून भरपूर काही शिकता आले असते. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, जर्मनी, अर्जेटिना, स्पेन, नेदरलॅण्ड्ससारख्या संघांनी आपला दबदबा राखला आहे. एकेकाळी हॉकीचे सुवर्णयुग अनुभवणाऱ्या भारताची आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये सध्या बरीच पिछेहाट झाली आहे. पाकिस्तान संघही या ताकदवान संघांच्या तुलनेत बराच मागे पडला आहे. या बडय़ा संघांचा मुकाबला करण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी हॉकी मालिका होणे आवश्यक होते. मार्च महिन्यात भारतीय संघ हॉकी मालिकेसाठी पाकिस्तानात जाणार होता. पण सध्याच्या परिस्थितीमुळे या मालिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याचबरोबर आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेतील मुंबईतील सामन्यांबाबतही शिवसेनेने विरोध दर्शवला. त्यामुळे अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला पाकिस्तानचे सामने मुंबईबाहेर खेळवावे लागले. सध्या दोन्ही देशांमधील दुरावा वाढत चालला आहे. पाकिस्तानच्या कुटीर कारवायांमुळे भारतीयांचा जनक्षोभ वाढत चालला आहे. खरं तर हे दोन देश युद्धाच्या मैदानावर नव्हे, तर खेळाच्या मैदानावर एकमेकांशी लढावेत, अशीच दोन्ही देशांतील जनतेची भावना आहे. पण पाकिस्तानने अवलंबिलेल्या अघोरी कारवाया थांबवायला हव्यात. भारतात आलेल्या पाकिस्तानी खेळाडूंना आपण जो सन्मान दिला, तोच सन्मान पाकिस्तानने सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांना आणि देशवासीयांना द्यावा, हीच तमाम भारतीयांची अपेक्षा आहे.