द्युती चंद आणि टिंटू लुका यांनी वरिष्ठ राष्ट्रीय मैदानी स्पध्रेच्या अखेरच्या दिवशी सुवर्णपदकाची कमाई करताना रेल्वेचे वर्चस्व अबाधित राखले. द्युतीने २०० मीटर व ४ बाय १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून खात्यात एकूण तीन सुवर्णपदके जमा केली.

द्युतीने २०० मीटर धावण्याची शर्यत २३.६९ सेकंदांत जिंकली. तिने उत्कंठापूर्ण शर्यतीत श्रावणी नंदा व आशा रॉय यांना मागे टाकून हे यश मिळविले. महिलांच्या ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत विजेतेपदाच्या दावेदार असलेल्या टिंटूने हे अंतर २ मिनिटे ०.५६ सेकंदात पार करीत स्पर्धा विक्रम नोंदविला. तिने रोझा कुट्टीचा १९९७ मधील २ मिनिटे १.०६ सेकंद हा विक्रम मोडला. गोमतीकुमारी व क्षिप्रा सरकार यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळाले. या पदकांमुळे रेल्वेने २६७ गुणांची कमाई करीत जेतेपद कायम राखले. ओएनजीसी (१८५) आणि सेनादल (१७४.५) यांना अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या स्वाती गाढवेने रेल्वेचे प्रतिनिधित्व करताना १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक मिळविले. तिने हे अंतर ३४ मिनिटे ३३ सेकंदांत पार केले.