१६ वर्षांपूर्वीचा रचिता मिस्त्रीचा विक्रम मोडला; ओदिशाच्या अमिया मलिकचीही छाप
ओदिशाची धावपटू द्युती चंदच्या राष्ट्रीय विक्रमाने फेडरेशन चषक राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक स्पध्रेचा पहिला दिवस गाजवला. द्युतीने महिलांच्या १०० मीटर शर्यतीत ११.३३ सेकंदाची वेळ नोंदवून १६ वर्षांपूर्वीचा रचिता मिस्त्रीने नोंदवलेला ११.३८ सेकंदाचा विक्रम मोडला.
ओदिशाच्याच अमिया कुमार मलिकने पुरुषांच्या १०० मीटर शर्यतीच्या उपांत्य फेरीत राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. त्याने १०.२६ सेकंदाची वेळ नोंदवली. याआधी अब्दुल नजीब कुरेशीने २०१०मध्ये १०.३० सेकंदाची वेळ नोंदवली होती. ़रिओ ऑलिम्पिक प्रवेश निश्चित मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या स्पध्रेत पहिल्या दिवशी एकाही भारतीय खेळाडूला ऑलिम्पिक पात्रता मिळवता आली नाही. तीन दिवस ही स्पर्धा चालणार आहे.
महिलांच्या १०० मीटर शर्यतीत द्युतीने विक्रमी वेळेसह सुवर्णपदक पटकावले असले तरी सेकंदाच्या शतांश भागाने तिला रिओ ऑलिम्पिकची पात्रता मिळवता आली नाही. ओदिशाच्याच सरबानी नंदाने (११.४५ सेकंद) आणि कॅनरा बँकेच्या एच.एम. ज्योतीने (११.४६ सेकंद) अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकावले. ‘रिओ ऑलिम्पिकची पात्रता मिळवण्यात अपयश आले, परंतु त्याने मी निराश नाही. राष्ट्रीय विक्रम आता माझ्या नावावर असल्याचा आनंद आहे. रिओ पात्रता मिळवण्यासाठी अजून तीन महिन्यांचा वेळ माझ्याकडे आहे,’ असे द्युती म्हणाली.
पुरुषांच्या १०० मीटर शर्यतीत बिहारच्या ज्योतिशंकर देबनाथने सुवर्णपदक जिंकले, तर कृष्णकुमार राणे (१०.४४ सेकंद) आणि मोहम्मद अब्दुल कुरेशी (१०.५० सेकंद) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले. राष्ट्रीय विक्रम नोंदवणाऱ्या अमियाला अंतिम फेरीत १०.५१ सेकंदासह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
‘एकाच दिवशी तीन शर्यतीत पळणे कठीण आहे. उपांत्य फेरीत मांडीचे स्नायूू ताणले गेले होते आणि त्यामुळेच अंतिम फेरीत चांगली कामगिरी करता आली नाही,’असे अमियाने सांगितले. विशेष म्हणजे एप्रिलमध्ये इंडियन
ग्रां. प्रि. स्पध्रेत १०.१६ सेकंदाची वेळ नोंदवून अमियाने ऑलिम्पिक पात्रता वेळ नोंदवली होती, परंतु  विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे ही वेळ लेखी नोंदवण्यात आली. त्यामुळे ती वेळ ग्राह्य धरण्यात आली नव्हती.  आशियाई विजेता आणि रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या गोळाफेकपटू इंदरजीत सिंगला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ओएनजीसीच्या तजिंदरपाल सिंग तूरने सुवर्णपदक जिंकले.

स्वामी गाढवेला रौप्य
महाराष्ट्राच्या स्वाती गाढवेने ५००० मीटर शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली. तिने १५ मिनिटे ४४.०० सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. १५: ३९.५९ सेकंदाची वेळ नोंदवणाऱ्या एल. सुरियाने सुवर्णपदक पटकावले, तर संजीवनी जाधवला (१६:३६.९२) कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या श्रद्धा घुलेने लांब उडीत ६.२१ मीटर अंतर पार करून कांस्यपदक निश्चित केले. एम. ए. प्रजुशा (६.३० मीटर) आणि व्ही. निना (६.२४ मीटर) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक पटकावले.