ईडन गार्डन्सवर पाकिस्तानविरुद्ध अद्याप एकदाही एकदिवसीय सामन्यात विजय न मिळाल्याचा भूतकाळ पाकिस्तानच्या पाठीशी आहे. याचप्रमाणे चेन्नईच्या चेपॉकवर पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून पाकिस्तानचा संघ मालिका विजयाच्या ईष्रेनेच कोलकात्यामध्ये आला आहे. ईडन गार्डनवर आजपासून (गुरुवार) पाकिस्तानविरुद्ध सुरु झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यासाठी रोहित शर्माच्या जागी जाडेजाला संधी देण्यात आली आहे.
दरम्यान पाकिस्तानची सुरूवात चांगली झाली. पाकिस्तानची सलामीची जोडी नसीर जमशेद आणि मोहम्मद हाफिझ यांनी सतरा षटकांमध्ये शंभर धावांची भागिदारी केली आहे. मोहम्मद हाफिझ याने ५२ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले तर, नसिर जमशेदनेही ५५ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले.
पाकिस्तानी संघाने कोलकात्यामध्ये दोन्ही दिवस सराव केला, परंतु चेन्नईच्या एकदिवसीय सामन्यानंतर भारतीय संघ विसावला आणि मंगळवारी संपूर्ण संघ कोलकात्यात दाखल होईपर्यंत सायंकाळ झाली. त्यामुळे भारतीय संघ मंगळवारी सराव करू शकला नाही. पण बुधवारी भारतीय संघाने कसून सराव केला. ईडन गार्डन्सवरील ही लढत जिंकून नव्या वर्षांची चांगली सुरुवात करण्याचे ध्येय भारतीय संघाने बाळगले आहे.
 या मालिकेत भारतीय संघ १-० ने पिछाडीवर आहे.