बेडर  आणि अरे ला कारे करणारा क्रिकेटपटू म्हणून जोनाथन ट्रॉटने अल्पाधवीतच क्रिकेटविश्वात स्थान निर्माण केले. दोन वर्षांपूर्वी अ‍ॅशेस मालिकेदरम्यान मानसिक आजाराचे कारण देत त्याने घेतलेली माघार क्रिकेट चाहत्यांना धक्का देणारी होती. या अनपेक्षित आजारातून सावरत ट्रॉटने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेद्वारे आंतरराष्ट्रीय  क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेशी कामगिरी करता येऊ न शकल्याने ट्रॉटने क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडमधील स्थानिक क्रिकेटमधील संघ वॉरविकशायरसाठी खेळत राहणार असल्याचे ट्रॉटने स्पष्ट केले.
वेस्ट इंडिज दौऱ्यावर ट्रॉटला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. या मालिकेत सहा डावांत मिळून त्याला केवह ७२ धावाच करता आल्या आणि त्यात तीनवेळा तो शुन्यावर माघारी परतला. ‘‘ हा निर्णय घेणे खूप कठीण होते, परंतु इंग्लंड संघाला माझ्याकडून ज्या प्रकारच्या खेळाची अपेक्षा आहे, ती पूर्ण करण्यात मी अपयशी ठरलो.’’, असे मत ट्रॉटने व्यक्त केले. तो म्हणाला, ‘‘ संघात पुन्हा स्थान मिळणे आणि पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे, हे माझे भाग्य समजतो. मात्र, अपेक्षांवर खरे उतरला आले नाही, याची खंत वाटते.’’
‘‘या निमित्ताने मी सर्वाचे आभार मानू इच्छितो, त्यांनी मला मदत केली आणि पुन्हा इंग्लंड संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. वर्षांनुवष्रे पाठीशी उभे राहणाऱ्या चाहत्यांचेही आभार. इंग्लंडला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.’’, असे मत व्यक्त करताना ट्रॉट भावूक झाला होता. आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या ट्रॉटने मात्र काउंटी क्रिकेट खेळणार असल्याचे सांगितले. तो म्हणाला ‘‘
इंग्लंड संघाकडून खेळताना अनेक चढ-उतार पाहिले. मात्र, परिस्थिती बदलली नाही. मी पुढचा विचार करत आहे आणि वॉर्विकशायर संघाकडून कारकिर्द सुरूच ठेवणार आहे. आशा करतो की संघाला जास्तीत जास्त विजय मिळवून देणारा खेळ माझ्याकडून होईल.’’

ट्रॉटसोबत खेळायला मिळाले, हे माझे भाग्य समजतो. त्याने कारकिर्दीत मिळवलेल्या यशाचा आम्हाला अभिमान आहे. तो संघात असताना आम्ही अनेक ऐतिहासिक विजय मिळवले आहेत. त्याने केलेले पुनरागमन त्याच्या कणखर वृत्तीचे प्रतीक आहे.
अ‍ॅलिस्टर कुक, इंग्लंडचा कर्णधार