गोलंदाजांच्या सुरेख प्रदर्शनाच्या बळावर इंग्लंडने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ३३० धावांनी विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने चार सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. जो रूटच्या द्विशतकासह इंग्लंडने पहिला डाव ५८९ धावांवर घोषित केला. पाकिस्तानचा पहिला डाव १९८ धावांतच आटोपला. इंग्लंडने दुसरा डाव १ बाद १७३ धावांवर घोषित करत पाकिस्तानपुढे ५६५ धावांचे लक्ष्य ठेवले. इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीपुढे पाकिस्तानचा दुसरा डाव २३४ धावांतच गडगडला. इंग्लंडतर्फे जेम्स अँडरसन, ख्रिस वोक्स व मोइन अली यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. रूटला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

 

श्रीलंकेची घसरगुंडी

पीटीआय, पल्लेकल

श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मंगळवारपासून सुरू झालेल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी अवघ्या १२४ धावांत १२ गडी बाद झाले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या यजमान श्रीलंकेचा डाव ११७ धावांत गडगडला. प्रत्युत्तरात दाखल झालेल्या ऑस्ट्रेलियाची अवस्थाही २ बाद ७ अशी दयनीय झाली होती, परंतु उस्मान ख्वाजा आणि स्टिव्हन स्मिथ यांनी संयमी खेळ करून दिवसअखेर संघाला २ बाद ६६ अशा सुस्थितीत आणले. मुसळधार पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ चहापानानंतर थांबवण्याचा निर्णय घेतला.

कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय श्रीलंकेच्या अंगलट आला. जोश हेझलवूड (३/२१), नॅथन लियॉन (३/१२) यांनी श्रीलंकेच्या डावाला खिंडार पाडले. त्यांना मिचेल स्टार्क (२/५१) आणि स्टीव्ह ओ’कफी (२/३२) यांची उत्तम साथ लाभली. श्रीलंकेचा डाव ३४.२ षटकांत ११७ धावांवर संपुष्टात आणल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनाही अपयश आले. जो बर्न आणि डेव्हिड वॉर्नर यांना अनुक्रमे रंगना हेराथ व नुवान प्रदीप यांनी माघारी पाठवले. त्यानंतर ख्वाजा व स्मिथने ऑस्ट्रेलियाची पडझड थांबवली.

संक्षिप्त धावफलक

  • श्रीलंका : ११७ (धनंजय डी सिल्व्हा २४, कुसल परेरा २०; जोश हेझलवूड ३/२१, नॅथन लियॉन ३/१२)
  • ऑस्ट्रेलिया : २ बाद ६६ (उस्मान ख्वाजा खेळत आहे २५, स्टिव्ह स्मिथ खेळत आहे २८).