युरो-२०१६ चषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीमध्ये इंग्लंड आणि स्पेन या मातब्बर संघांनी दमदार विजय मिळवले आहेत. इंग्लंडने स्लोव्हेनियाला ३-१ असे पराभूत केले, तर स्पेनने बेलारूसवर ३-० असा सहज विजय मिळवला.
इंग्लंड-स्लोव्हेनिया यांच्यातील सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी जोरदार आक्रमणे केली असली तरी एकही गोल होऊ शकला नाही. दुसऱ्या सत्रात ५८व्या मिनिटाला इंग्लंडच्या जॉर्डन हेंडरसनने स्वयंगोल केल्यामुळे स्लोव्हेनियाचे खाते उघडले गेले. पण त्यानंतर एकाच मिनिटात वेन रूनीने सुंदर गोल करीत संघाला १-१ अशी बरोबरी करून दिली. रूनीचा हा इंग्लंडसाठी शंभरावा सामना होता. या सामन्यात त्याने ४४व्या गोलची नोंद केली. त्यानंतर डॅनी वेलबेकने ६६ आणि ७२व्या मिनिटाला गोल करीत संघाला विजय मिळवून दिला.
स्पेनकडून मध्यरक्षक इस्कोने १८व्या मिनिटाला गोल करीत संघाचे खाते उघडले. त्यानंतर एकाच मिनिटात सर्गियो बसक्युएट्सने दुसरा गोल करीत संघाची आघाडी वाढवली. या दोन गोलमुळे स्पेनने मध्यंतरापर्यंत २-० अशी दमदार आघाडी घेतली होती. सामन्याच्या ५५व्या मिनिटाला पेट्रो रॉड्रिगेझने गोल करीत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.