इंग्लंड म्हणजे क्रिकेटच्या जन्मदात्यांचा देश. पहिल्या तिन्ही ६० षटकांच्या आणि मग १९९९च्या ५० षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेचे यजमान. परंतु तरीही इंग्लिश संघाला जगज्जेतेपदावर मोहर मात्र अद्याप उमटवता आलेली नाही. विश्वचषकाच्या चाळीस वर्षांच्या इतिहासातील हे कटू सत्य इंग्लंड संघाला सतत बोचते आहे. १९७९, १९८७ आणि १९९२ मध्ये इंग्लंड संघाने अंतिम फेरीपर्यंत झेप घेतली. परंतु वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांनी त्यांना विश्वविजेतेपद जिंकू दिले नाही.
विश्वचषक एकदिवसीय क्रिकेटच्या गौरवशाली अध्यायाला प्रारंभ झाला तो इंग्लंड आणि भारत यांच्यातील सामन्याने. डेनिस अमिसच्या १३७ धावांच्या बळावर इंग्लंडने ४ बाद ३३४ धावा उभारल्या. परंतु भारताने ६० षटके खेळून जेमतेम ३ बाद १२३ धावा केल्याने इंग्लंडला २०२ धावांनी दिमाखात विजय साजरा करता आला. एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात संथ खेळी सुनील गावसकरने याच सामन्यात नोंदवली. त्याने १७४ चेंडू मैदानावर तग धरून फक्त ३६ धावा केल्या होत्या. मग न्यूझीलंड आणि ईस्ट आफ्रिकेला हरवून इंग्लंडने उपांत्य फेरी गाठली. हेडिंग्लेची खेळपट्टी फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरली. गॅरी गिल्मरच्या गोलंदाजीच्या बळावर इंग्लिश संघ फक्त ९३ धावांत गारद झाला. मग ऑस्ट्रेलियाने हे आव्हान पार करण्यासाठी सहा फलंदाज गमावले होते. माइक ब्रेअर्लीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ १९७९मध्ये रुबाबात खेळला. डेव्हिड गॉवर, ग्रॅहम गूच, जेफ बायॅकॉट, माइक हेण्ड्रिक आणि इयान बोथमसारखे खंदे वीर या संघात होते. इंग्लंडने पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. मग कॅनडा आणि पाकिस्तानला हरवल्यानंतर उपांत्य फेरीत न्यूझीलंडला हरवणे, त्यांना जड गेले नाही. अंतिम फेरीत मात्र विंडीजने दुसऱ्यांदा जगज्जेतेपदाचा मान मिळविताना इंग्लंडवर ९२ धावांनी विजय मिळवला. १९८३ मध्ये बॉब विलिसच्या नेतृत्वाखाली डेव्हिड गॉवर, अ‍ॅलन लॅम्ब आणि इयान बोथम यांसारख्या खेळाडूंसह इंग्लंडने पुन्हा विश्वविजेतेपदाची आशा धरली. ‘अ’ गटातून इंग्लंडने सहापैकी पाच विजय मिळवीत गटविजेतेच्या थाटात उपांत्य फेरी गाठली. फक्त न्यूझीलंडविरुद्धची रोमहर्षक लढत त्यांनी एक चेंडू आणि दोन विकेट राखून गमावली होती. मग ओल्ड ट्रॅफर्डला उपांत्य फेरीत भारताने सहा विकेट राखून इंग्लंडला हरवले. १९८७च्या विश्वचषकाला इंग्लंडचा संघ अधिक तयारीनिशी सामोरा गेला. या संघात ग्रॅहम गूच, अ‍ॅलन लॅम्ब, बिल अ‍ॅथने यांचा समावेश होता. साखळीत इंग्लंडने सहापैकी चार सामने जिंकले. त्यांनी दोन्ही सामने पाकिस्तानविरुद्ध गमावले. उपांत्य फेरीत ग्रॅहम गूचचे शतक आणि एडी हेमिंग्सच्या गोलंदाजीच्या बळावर इंग्लंडने भारताला हरवून मागील विश्वचषकाच्या पराभवाचे उट्टे फेडले. अंतिम सामन्यात विश्वचषक जिंकण्यासाठी इंग्लंडपुढे २५४ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ठेवले होते. परंतु योग्य धावगती न राखल्यामुळे इंग्लंडला शेवटच्या पाच षटकांत ४६ आणि मग अखेरच्या षटकात विजयासाठी १७ धावा करण्याचे आव्हान समोर होते. क्रेग मॅकडरमॉटने ५०व्या षटकात फक्त १० धावा देऊन इंग्लंडचे विश्वविजेतेपद जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. १९९२ मध्ये संभाव्य विजेते गणल्या जाणाऱ्या इंग्लंडची धुरा ग्रॅहम गूचकडे होती, तर अ‍ॅलेक स्टुअर्ट, रॉबिन स्मिथ, ग्रॅमी हिक यांच्यासारखे हुकमी खेळाडू त्यांच्याकडे होते. श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्याकडून धक्कादायक पराभव पत्करूनही इंग्लंडने साखळीतील दुसऱ्या स्थानासह उपांत्य फेरी गाठली. मग दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा उपांत्य फेरीचा सामना पावसाच्या नियमामुळे वादग्रस्त ठरला होता. १३ चेंडूंत २२ धावांची दक्षिण आफ्रिकेला आवश्यकता असताना पाऊस वर्षांवला आणि त्यानंतर आफ्रिकेला विजयासाठी एका चेंडूत २१ धावाचे आव्हान समोर ठेवण्यात आले. या विश्वचषकाचा अंतिम सामनाही तितकाच रोमहर्षक झाला. पाकिस्तानने २२ धावांनी हरवल्यामुळे इंग्लडला पुन्हा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. माइक आर्थर्टनच्या नेतृत्वाखालील १९९६च्या इंग्लंड संघात डॉमिनिक कॉर्क, फिल डीफ्रेटास, डॅरेन गॉघ, नील स्मिथ यांच्यासारखे अष्टपैलू खेळाडू आणि स्टीवर्ट, ग्रॅमी हिक, ग्रॅहम थॉर्प आणि नील फेअरब्रदर यांच्यासारखे सामना जिंकून देऊ शकणारे फलंदाज होते. पण तरीही इंग्लंडला साखळीत पाच पैकी फक्त दोन सामने जिंकता आले आणि उपांत्यपूर्व फेरी श्रीलंकेने त्यांना हरवले.
१९९९ मध्ये विश्वचषकाचे यजमानपद १६ वर्षांनी पुन्हा इंग्लंडला मिळाले. परंतु स्टुअर्टच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ साखळीतच गारद झाला. साखळीत इंग्लंड, भारत आणि झिम्बाब्वे यांच्या खात्यावर समान गुण जमा होते. मात्र सरस धावगतीमध्ये इंग्लंडचा पत्ता कट झाला. २००३ मध्ये कर्णधार नासिर हुसेनच्या इंग्लंड संघाला पुन्हा साखळीचा अडथळा ओलांडण्यात अपयश आले. या वेळी सरस धावगतीमध्ये पुन्हा झिम्बाब्वेने इंग्लंडला मागे टाकले, परंतु याला जबाबदार ते स्वत:च ठरले. हरारेला होणारा झिम्बाब्वेविरुद्धचा साखळी सामना सुरक्षेच्या कारणास्तव द. आफ्रिकेत खेळवण्याचा इंग्लंडचा प्रस्ताव आयसीसीने झिडकारला. मग इंग्लंडने हा सामना टाळल्यामुळे झिम्बाब्वेला विजयाचे पूर्ण गुण बहाल करण्यात आले.
२००७ मध्ये मायकेल वॉनच्या इंग्लिश संघाने साखळीचा टप्पा आरामात पार केला, परंतु ‘सुपर एट’मध्ये श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिकेकडून पत्करलेल्या पराभवांमुळे या संघाला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. मग २०११च्या विश्वचषकात इंग्लंडची कामगिरी धक्कादायक अशीच होती. भारताविरुद्ध बंगळुरूची लढत टाय झाली, तर आर्यलड आणि बांगलादेशसारख्या संघांनी इंग्लंडचा अनपेक्षित पराभव केला. परंतु नेदरलँड्स, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिकेवरील विजयाच्या बळावर अ‍ॅण्ड्रय़ू स्ट्रॉसच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला. पण श्रीलंकेने १० विकेट राखून आरामात विजय मिळवीत इंग्लंडचे आव्हान संपुष्टात आणले.
पहिल्या पाच विश्वचषक स्पर्धामध्ये इंग्लंडने अंतिम फेरी किंवा उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. परंतु त्यानंतरच्या पाच स्पर्धामध्ये मात्र त्यांची कामगिरी फारशी लक्षवेधी नव्हती. या पाश्र्वभूमीवर इंग्लंडकडून फारशा अपेक्षा केल्या जात नसल्या तरी हा संघ यंदा अनपेक्षित यश मिळवू शकेल, असा जाणकारांचा अंदाज आहे.
संघ : ईऑन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, गॅरी बॅलन्स, इयान बेल, रवी बोपारा, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, स्टीव्हन फिन, अ‍ॅलेक्स हेल्स, ख्रिस जॉर्डन, जो रूट, जेम्स टेलर, जेम्स ट्रेडवेल, ख्रिस वोक्स.
प्रशिक्षक : पीटर मूरस्
साखळीतील सामने :
१४ फेब्रुवारी- वि. ऑस्ट्रेलिया,
२० फेब्रुवारी- वि. न्यूझीलंड,
२३ फेब्रुवारी- वि. स्कॉटलंड,
१ मार्च- वि. श्रीलंका,
९ मार्च- वि. बांगलादेश,
१३ मार्च- वि. अफगाणिस्तान.

इंग्लंड (अ-गट)
क्रमवारीतील स्थान : ५
सहभाग : १९७५ ते २०१५ (सर्व)
उपविजेतेपद : १९७९, १९८७, १९९२
उपांत्य फेरी : १९७५, १९८३

अपेक्षित कामगिरी
इंग्लंडचा ‘अ’ गटातील प्रवास खडतर असाच असेल. सध्याची त्यांची कामगिरी पाहता यजमान न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाचे संघ त्यांना तगडे आव्हान देऊ शकतील. त्यामुळे गटातून तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानासह हा संघ उपांत्यपूर्व फेरी गाठू शकेल. त्यामुळे पर्यायाने भारत किंवा द. आफ्रिकेचे आव्हान त्यांच्यापुढे असेल. इंग्लंडची सध्याची कामगिरी पाहता उपांत्यपूर्व फेरीपर्यंतच त्यांची वाटचाल मर्यादित राहू शकेल.

बलस्थाने व कच्चे दुवे
ईऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेला इंग्लंडचा संघ विश्वविजेतेपद जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. डिसेंबरमध्ये श्रीलंकेने एकदिवसीय मालिकेत इंग्लंडचा ५-२ असा पराभव केला होता. तशी २०१४ या वर्षांत इंग्लंडची एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी समाधानकारक नव्हती. त्यामुळे इंग्लंडच्या निवड समितीला खडबडून जाग आली आहे. अ‍ॅलिस्टर कुकसारख्या खंद्या फलंदाजांसह बेन स्टोक्स आणि हॅरी गर्ने यांना वगळण्याचे धारिष्टय़ त्यांनी दाखवले. जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड दुखापतीतून सावरून पुन्हा संघात परतले आहेत. फलंदाज गॅरी बॅलन्सलाही त्यांनी स्थान दिले आहे. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर खेळण्याचा दांडगा अनुभव इंग्लंडच्या गाठीशी आहे. आतासुद्धा इंग्लंडचा संघ तिरंगी एकदिवसीय स्पध्रेत खेळत आहे. त्यामुळे इंग्लंडला पहिल्यांदा जगज्जेतेपदाची आशा धरायला कोणतीही हरकत नाही.