महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा
इंग्लंडचे गतविश्वविजेतेपद टिकविण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. परंतु शुक्रवारी ब्रबॉर्न स्टेडियमवर होणाऱ्या प्ले-ऑफच्या सामन्यात न्यूझीलंडला नमवून किमान तिसरे स्थान प्राप्त करण्यासाठी इंग्लंडचा संघ उत्सुक आहे.
बुधवारी वेस्ट इंडिजने चमत्कार घडविताना ऑस्ट्रेलियाला हरविण्याची किमया साधून अंतिम फेरीत स्थान पक्के केले. परंतु त्यामुळे विश्वविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड या संघांचे स्पध्रेतील आव्हान संपुष्टात आले. सुपर सिक्सच्या अखेरच्या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडला १५ धावांनी पराभूत केले होते. या सामन्यात चार्लट एडवर्ड्सच्या नेतृत्वाखालील इंग्लिश संघाच्या दम्ृष्टीने काही सकारात्मक गोष्टी घडल्या. यष्टीरक्षक-फलंदाज सारा टेलरला फॉर्म गवसला आणि तिने ७९ चेंडूंत ८८ धावा काढल्या. भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ३५ धावा काढणारी सारा त्यानंतरच्या तीन सामन्यांत भोपळाही फोडण्यात अपयशी ठरली होती.
‘‘तिसरे स्थान आणि आयसीसी क्रमवारीच्या दृष्टीने आम्हाला शुक्रवारचा सामना महत्त्वाचा आहे. इंग्लिश संघ प्रत्येक सामना विजयासाठी खेळतो आणि हे ध्येय आमचे कायमच असेल. आम्ही गतविजेतेपद राखू न शकल्याबद्दल कमालीच्या निराश झाल्या आहोत. इंग्लंडच्या संघातील आम्हा सर्वच मुलींचा अजूनही यावर विश्वास बसत नाही,’’ असे एडवर्ड्सने  सांगितले.