भारताची कर्णधार मिताली राजचा आत्मविश्वास

आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त करणे यजमान इंग्लंडसाठी सोपे नसेल. अंतिम फेरीत त्यांना कडवा संघर्ष करावा लागेल, असे आत्मविश्वासपूर्ण प्रतिपादन भारताची कर्णधार मिताली राजने केले.

विश्वचषकाच्या सलामीच्याच सामन्यात भारताने इंग्लंडवर ३५ धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे रविवारी लॉर्ड्सवर होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात आहे. याबाबत राज म्हणाली, ‘‘एक संघ म्हणून अंतिम फेरी खेळण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. विश्वचषक स्पर्धा आव्हानात्मक असेल, याची जाणीव होती. परंतु खेळाडूंनी संघाची गरज समजून परिस्थितीनुरूप फलंदाजी आणि गोलंदाजी उंचावली. त्यामुळेच इंग्लंडसाठी भारतीय आव्हान सोपे नसेल. पण अर्थात अंतिम फेरीत कोणाची कामगिरी सर्वोत्तम होईल, तोच संघ जिंकेल.’’

ती पुढे म्हणाली, ‘‘योजना आणि रणनीती याबाबत गांभीर्याने विचार करीत आहोत. पहिल्या सामन्यात पराभवानंतर इंग्लंडचा खेळ कमालीचा उंचावला होता, हेही विसरता कामा नये. यजमान संघाविरुद्ध अंतिम फेरीत खेळणे, हे आव्हानात्मक असते. परंतु हा संघ असे कोणतेही दडपण बाळगत नाही.’’

गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत हरवण्यात हरमनप्रीत कौरच्या झंझावाती ११५ चेंडूंत १७१ धावांच्या खेळीने सिंहाचा वाटा उचलला होता. या विजयाबद्दल राज म्हणाली, ‘‘हरमनची खेळी असाधारण अशीच होती. गोलंदाजांनीही उत्तम कामगिरी केली. झुलन गोस्वामीला सूर गवसला आहे. शिखा पांडेने टिच्चून गोलंदाजी केली. याचप्रमाणे फिरकी गोलंदाजांनीही उत्तम गोलंदाजी केली.’’

ती पुढे म्हणाली, ‘‘पराभवानंतर आम्ही न्यूझीलंडविरुद्ध विजयी पुनरागमन केले आणि मग उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला हरवणे, हे मोठे यश आहे.’’

भारतीय संघाच्या कामगिरीविषयी राज म्हणाली, ‘‘भारताकडे आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आहेत. प्रत्येक सामन्यात त्यांच्या खेळाचा प्रत्यय येत आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात स्मृती मंधानाने आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी साकारली होती. पूनम राऊतने साखळीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झुंजार खेळ केला. आता हरमनप्रीतने चमत्कार घडवला. त्यामुळे संघाची आघाडीची फळी जबाबदारीने फलंदाजी करीत आहे. गोलंदाजीच्या फळीकडूनही उत्तम साथ त्यांना मिळत आहे.’’

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात कौरने दुखऱ्या पायासह आपली खेळी उभारली होती. तिच्या दुखापतीबाबत राज म्हणाली, ‘‘रविवारी लॉर्ड्सवर होणाऱ्या महत्त्वाच्या लढतीत कौर संघासोबत असेल, याची मला खात्री आहे. कारण विश्वचषकाची अंतिम फेरी खेळणे, हा कोणत्याही खेळाडूसाठी आयुष्यातील सर्वोत्तम अनुभव असतो.’’

भारताने २००५मध्ये प्रथमच विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती, परंतु त्यावेळी उपविजेतेपदावर समाधान मानले होते. भारतीय संघाचा निर्धार प्रकट करताना राज म्हणाली, ‘‘जर आम्ही अंतिम फेरी जिंकू शकलो, तर ती भारतीय महिला क्रिकेटसाठी क्रांती ठरेल. भारताने विश्वचषक जिंकावा, असे प्रत्येकाचे म्हणणे आहे. त्यामुळे आता सर्वोत्तम कामगिरी करून दाखवण्याचे उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. हे सारे काही मला शब्दांत मांडणे कठीण जात आहे.’’

विजयाचे श्रेय कौरला – लॅनिंग

ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग भारताच्या विजयाचे श्रेय हरमनप्रीत कौरला दिले. कौरची खेळी प्रशंसनीय होती. तिच्या झंझावाताला रोखण्यात आम्ही अयशस्वी ठरलो. त्यामुळे अंतिम फेरीत पोहोचलेल्या भारताचे अभिनंदन, असे लॅनिंगने सामन्यानंतर सांगितले.