इंग्लंड फुटबॉल संघाचा कर्णधार स्टीव्हन गेरार्डने आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. ब्राझीलमध्ये नुकत्याच झालेल्या विश्वचषकात इंग्लंडचा संघ गेरार्डच्याच नेतृत्वाखाली खेळला होता. मात्र त्यांचे आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आले. त्यामुळे गेरार्डवर मोठय़ा प्रमाणावर टीका झाली होती.
गेरार्डने ११४ सामन्यांत इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले. २०००साली युक्रेनविरुद्ध पदार्पण त्याने केले. इंग्लंडसाठी सर्वाधिक सामने खेळणाऱ्यांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी आहे. तीन विश्वचषक स्पर्धा तसेच तीन युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेत त्याने इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले. त्याच्या नावावर २१ गोलांची नोंद आहे.
 ‘‘माझे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराचे मी मनापासून आभार मानतो. त्यांच्या भक्कम आधारामुळेच इंग्लंडसाठी खेळण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले. माझ्या कारकिर्दीत इंग्लंडचे प्रशिक्षक तसेच सहयोगी कर्मचाऱ्यांचेही योगदान महत्त्वपूर्ण आहे. अनेक मोठय़ा खेळाडूंच्या बरोबरीने खेळण्याचे भाग्य मला लाभले. बऱ्यावाईट प्रसंगात आमच्या मागे पाठीशी उभे राहणाऱ्या चाहत्यांना अभिवादन. ब्राझीलमध्ये आम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही, मात्र त्यांनी आमची साथ सोडली नाही. इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी देणाऱ्या रॉय हॉजसन यांचे कारकिर्दीतील स्थान अमूल्य आहे,’’ असे गेरार्डने यावेळी सांगितले.

‘‘हा माझ्यासाठी अत्यंत कठीण निर्णय होता. कारकीर्दीतल्या सर्वात आव्हानात्मक निर्णयांपैकी एक. इंग्लंडसाठी खेळलेल्या प्रत्येक क्षणाचा मी मनापासून आनंद लुटला. इंग्लंडची जर्सी मी पुन्हा परिधान करू शकणार नाही याचे दु:ख वाटते आहे. आता मी लिव्हरपूलसाठी खेळत राहणार आहे.
                         – स्टीव्हन गेरार्ड, इंग्लंडचा कर्णधार