इंग्लंडचा माजी कसोटी कर्णधार अॅलिस्टर कुक हा त्याच्या शैलीदार फलंगादीसाठी ओळखला जातो. आतापर्यंत कुकने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. अवघ्या ३१ व्या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडणारा कुक हा पहिलाच तरुण खेळाडू ठरला.

फलंदाजीव्यतिरीक्त कुक हा स्लिपमध्ये उत्कृष्ठ खेळाडू मानला जातो. इंग्लंडच्या भारत दौऱ्यादरम्यान त्याने आपल्या फलंदाजीसोबत स्लिपमध्ये काही कठीण झेल घेत कुकने आपलं ते ही कसब दाखवून दिलं होतं. मात्र भारतीय संघाकडून ४-० असा मार खाल्ल्यानंतर कुकने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर जो रुटकडे इंग्लंडच्या कर्णधारपदाची सुत्र सोपवण्यात आली आहेत.

सध्या सोशल मीडियावर अॅलिस्टर कुकचा क्षेत्ररक्षणातल्या चपळाईचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. इंग्लंडमधल्या एका स्थानिक सामन्यादरम्यान कुक एका मुलाखतकाराला मुलाखत देत होता. मात्र त्याचवेळी मैदानात त्याचे सहकारी सराव करत होते. याचवेळी एका खेळाडूने टोलवलेला चेंडू हा मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीच्या दिशेने येत होता, मात्र तो चेंडु कुकने मोक्याच्या क्षणी पकडून आपण मैदानात आजही किती चपळ आणि तंदुरुस्त आहोत हे दाखवून दिलं.
सरावादरम्यान खेळाडूने टोलवलेला चेंडू हा इतक्या वेगाने येत होता की जर कुकने तो झेल पकडला नसता तर मुलाखत घेणाऱ्याच्या चेहऱ्याला दुखापत होण्याची शक्यता होती. मात्र विजेच्या चपळाईने तो झेल घेणाऱ्या कुकचं कौशल्य पाहून मुलाखतकारही अवाक झाला.

१४० कसोटी सामन्यांमध्ये कुकने ११५०७ धावा केल्या आहेत. याचसोबत क्षेत्ररक्षणादरम्यान कुकने १४१ झेलही पकडले आहेत.