* कर्णधार एडवर्ड्सचे नाबाद दमदार शतक,
* इंग्लंडचा न्यूझीलंडवर ४ विकेट्सनी विजय
* गतविजेता इंग्लंड तिसऱ्या तर न्यूझीलंड चौथ्या स्थानावर
रंगीत तालीम असो किंवा प्रत्यक्ष मोक्याचा सामना, कोणत्याही वेळी आम्हीच सरस असल्याचे इंग्लंडने कर्णधार चार्लेट एडवर्ड्सच्या दमदार नाबाद शतकाच्या जोरावर दाखवून दिले. गतविजेत्या इंग्लंडला यावेळी अंतिम फेरीत पोहोचता आले नसले तरी तिसरा क्रमांक मात्र त्यांनी पटकावला. सामनावीर एडवर्ड्सने आपल्या शैलीदार फलंदाजीच्या जोरावर संघाला चार विकेट्सनी विजय मिळवून दिला, तर पराभूत न्यूझीलंडला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
इंग्लंडने नाणेफेक जिंकत न्यूझीलंडला फलंदाजीला पाचारण केले. एका बाजूने फलंदाज धारातीर्थ पडत असताना अ‍ॅमी सटरवेटने ११ चौकारांच्या जोरावर ८५ धावांची खेळी साकारल्यामुळे न्यूझीलंडला इंग्लंडपुढे २२१ धावांचे आव्हान ठेवता आले.
न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना एडवर्ड्स सुरुवातीपासून इंग्लंडच्या पदरात विजयाचे दान टाकण्यापर्यंत खेळपट्टीवर शड्डू ठोकून उभी राहिली. एडवर्ड्सने अन्य फलंदाजांची तमा न बाळगता १५ चौकारांच्या जोरावर नाबाद १०६ धावांची खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड : ५० षटकांत ८ बाद २२० (अ‍ॅमी सटरवेट ८५; होली कोल्विन ३/३१) पराभूत वि. इंग्लंड : ४७ षटकांत ६ बाद २२२ (चार्लेट एडवर्ड्स नाबाद १०६; सीआन रक २/२०), सामनावीर : चार्लेट एडवर्ड्स.