वेस्ट इंडिजचा पहिला डाव २९५ धावांत गुंडाळून सामन्यावर मजबूत पकड घेण्यासाठी सज्ज असलेल्या इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात अडखळत झाली. मात्र, गॅरी बॅलन्स आणि जो रूट या जोडीने २ बाद ५२ धावांवरून संघाला सावरत तिसऱ्या दिवसअखेर ३ बाद ११६ धावांची मजल मारली. या दोघांच्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने २२० धावांची जबरदस्त आघाडी घेतली आहे.
इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३९९ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा डाव २९५ धावांवर संपुष्टात आला. ४ बाद १५५ धावांवरून तिसऱ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या वेस्ट इंडिजला जेम्स ट्रेडवेलने धक्के दिले. शिवनारायण चंदरपॉल (४६) आणि जर्माइन ब्लॅकवूड (नाबाद ११२) यांनी संघाला २९५ धावांपर्यंत मजल मारून दिली.
पहिल्या डावात १०४ धावांची आघाडी घेऊन पुन्हा मैदानावर उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. अ‍ॅलिस्टर कुक (१३), जोनाथन ट्रॉट (४) आणि इयान बेल (११) हे लवकर बाद झाले. मात्र बॅलन्स आणि रूटने संयमी खेळ करत संघाला मजबूत आघाडी मिळवून दिली. बॅलन्स ४४ धावांवर, तर रूट ३२ धावांवर खेळत आहे.