अवघ्या २४ तासात भारतीय संघासमोरच्या ‘फॉलोऑन वाचवा’ अभियानाचे रुपांतर ‘कसोटी वाचवा’ अभियानात झाले आहे. चौथ्या दिवशी भारतीय संघ फॉलोऑन टाळू शकला नाही. मात्र इंग्लंडच्या संघाने पुन्हा फलंदाजीचा निर्णय घेतला. आक्रमक पवित्र्यासह झटपट डाव घोषित करून त्यांनी भारतीय संघासमोर ४४५ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर भारतीय संघाची ४ बाद ११२ अशी अवस्था झाली आहे. अजिंक्य रहाणे १८ तर रोहित शर्मा ६ धावांवर खेळत आहे. कसोटी अनिर्णित राखण्यासाठी भारताला पाचवा आणि अंतिम दिवस खेळून काढणे क्रमप्राप्त आहे तर इंग्लंडला कसोटी विजयासाठी ६ विकेट्सची आवश्यकता आहे.
८ बाद ३२३ धावांवरून पुढे खेळणाऱ्या भारतीय संघाला फॉलोऑन वाचवण्यासाठी ४७ धावांची आवश्यकता होती. मात्र तिसऱ्याच षटकात जेम्स अँडरसनच्या उसळत्या चेंडूवर पूल करण्याचा महेंद्रसिंग धोनीचा प्रयत्न फसला आणि यष्टीपाठी जोस बटलरने त्याचा झेल टिपला. धोनीला वैयक्तिक धावसंख्येत एका धावेचीही भर घालता आली नाही. त्याने ५० धावा केल्या. पदार्पणवीर पंकज सिंगलाही आखूड टप्प्याच्या चेंडूवर झेल द्यायला भाग पाडत जेम्स अँडरसनने डावात पाच बळी घेण्याची करामत केली. भारताचा डाव ३३० धावांत संपुष्टात आला. इंग्लंडला २३९ धावांची आघाडी मिळाली. जेम्स अँडरसनने ५३ धावांत ५ बळी घेतले.
प्रचंड आघाडी असलेल्या इंग्लंडने दुसऱ्या डावात आश्वासक सुरुवात केली. सॅम रॉबसनला भुवनेश्वर कुमारने शिखर धवनकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने १३ धावा केल्या. अ‍ॅलिस्टर कुक आणि गॅरी बॅलन्स जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. धावगती वाढवण्याच्या नादात बॅलन्स रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ५ चौकार आणि एका षटकारासह ३८ धावांची खेळी साकारली. इयान बेलने ४ चौकारांसह २३ धावा केल्या. जडेजाच्या गोलंदाजीवर चौकार खेचत कुकने सामन्यातील दुसऱ्या अर्धशतकाची नोंद केली. जो रुटने ४१ चेंडूत ९ चौकारांसह ५६ धावांची वेगवान खेळी केली. कुक-रुट जोडीने चौथ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली. इंग्लंडने दुसरा डाव ४ बाद २०५ धावांवर घोषित केला. भारताला विजयासाठी ४४५ धावांचे लक्ष्य मिळाले.
दुसऱ्या डावात, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न मुरली विजयला नडला आणि तो धावचीत झाला. त्याने १२ धावा केल्या. मोइन अलीच्या गोलंदाजीवर सुरेख झेल टिपत ख्रिस जॉर्डनने चेतेश्वर पुजाराला माघारी धाडले. त्याने २ धावा केल्या. विराट कोहली आणि शिखर धवनने तिसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी करत डाव सावरला. मात्र जो रुटने धवनला बाद करत ही जोडी फोडली. त्याने ३७ धावांची खेळी केली. मोइन अलीने विराट कोहलीला बाद करत भारतीय संघाला अडचणीत आणले. विराटने २८ धावा केल्या. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या मुंबईकर जोडीने संयमी खेळ करत पडझड थांबवली.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड (पहिला डाव) : ७ बाद ५६९ डाव घोषित, भारत (पहिला डाव) : सर्वबाद ३३० (अजिंक्य रहाणे ५४, महेंद्रसिंग धोनी ५०, जेम्स अँडरसन ५/५३). इंग्लंड (दुसरा डाव) : ४ बाद २०५ डाव घोषित (अ‍ॅलिस्टर कुक ७०, जो रुट ५६, रवींद्र जडेजा ३/५२). भारत (दुसरा डाव) : ४ बाद ११२ (शिखर धवन ३७, विराट कोहली २८, मोइन अली २/३३)