एका बाजूला राज्यातील पोलीस दलावरचे अंधश्रद्धेचे भूत सहजासहजी पाठ सोडत नसताना आता आंतरराष्ट्रीय पातळीवर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी केलेल्या खळबळजनक दाव्याने तोंडात बोट घालण्याची वेळ सर्वसामान्य क्रीडारसिकांवर आली आहे.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आणि अष्टपैलू बेन स्टोक्सने ते थांबलेल्या हॉटेलमध्ये भूताचा भास होत असल्याचा दावा केला आहे. या दोन क्रिकेटपटूंना सध्या भूताने पछाडल्याची चर्चा सुरू आहे.  
लॉर्ड्सवर भारताविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱया कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा संघ ‘लँघम’ या पंचतारांकीत हॉटेलमध्ये थांबलेला आहे. यावेळी संघातील स्टुअर्ट ब्रॉड आणि बेन स्टोक्सला हॉटेलमध्ये भूत असल्याचा भास झाला. हाटेलमध्ये रात्रीच्या वेळी घडत असलेल्या काही घटनांमुळे हे दोघेही सध्या त्रस्त आहेत. त्यामुळे दोघांना झोपही लागली नाही आणि दुसऱया दिवशी अपुऱया झोपेमुळे सामन्यातही त्यांच्याकडून खराब कामगिरी होत असल्याचे म्हटले जात आहे. लंडनमधल्या वृत्तपत्रांनीच याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे.
स्टुअर्ट ब्रॉड म्हणाला, “एका रात्री दीड वाजल्याच्या सुमारास मला अचानक जाग आली आणि माझ्या खोलीत कोणीतरी असल्याचा भास झाला. इतकेच नाही, तर खोलीच्या प्रसाधनगृहातील नळ अचानक सुरू झाले. मी तेथील लाईट लावला असता नळ अचानक बंद झाले. हे असे दोनवेळा झाले. त्यामुळे मला रात्रभर झोप लागली नाही.”
दुसऱया बाजूला बेन स्टोक्सने या हॉटेलमध्ये झोप येत नसल्याचे सांगत त्याच्या खोलीत भूत वावरत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. या दोन खेळाडूंच्या दाव्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंची झोप उडाली आहे. अनेकांनी आपली रुम बदलली आहे. तर, खेळाडूंच्या पत्नींनीही या हॉटेलमध्ये राहण्यास नकार दिला आहे.