शिखांनी एकदा का आपले अस्त्र बाहेर काढले तर त्याला रक्त लागल्याशिवाय ते म्यान करत नाहीत, अशी आख्यायिका आहे. रणांगणात उतरण्याची मॉन्टी पनेसारला संधी मिळत नव्हती, पण ती जेव्हा मिळाली तेव्हा प्रतिस्पध्र्याची लक्तरे त्यांच्याच मातीत त्याने वेशीवर टांगली. फिरकी खेळणे म्हणजे भारतासाठी ‘बाये हात का खेल’ असे म्हटले जायचे खरे, पण वानखेडेवर त्याने भारतीय कागदी वाघांची शिकार केली आणि त्यांच्या रक्ताने इंग्लंडच्या ललाटावर विजयाचा टिळा लावला. इंग्लंडचा संघ वेगवान माऱ्यासाठी प्रसिद्ध असला तरी वानखेडेच्या आखाडय़ात इंग्लंडच्या फिरकीची धार ठरली ती मॉन्टी पनेसार.
‘मॉन्टीला आम्ही पहिल्या कसोटी सामन्यात खेळवले नाही, ही आमची मोठी चूक होती. दुसऱ्या सामन्यात त्याला नक्कीच संधी देऊ,’ असे इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुकने वानखेडेवरील कसोटीच्या पूर्वसंध्येला सांगितले. दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला संघात स्थान दिले आणि त्याने तब्बल ११ बळी मिळवीत भारताला त्यांच्याच आखाडय़ात चीतपट करण्याची मोलाची भूमिका वठवली. मुख्य म्हणजे सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग या दोन्ही जगविख्यात फलंदाजांना त्याने दोन्ही डावांत बाद करण्याची किमया केली. सचिनचा पहिल्या डावात उडवलेला त्रिफळा, हा त्याच्या गोलंदाजीतील ‘मास्टर स्ट्रोक’ होता. तो चेंडू २३ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या सचिनलाही कळला नाही, यातच मॉन्टीच्या गोलंदाजीचे कौतुक करायला हवे. ही खेळपट्टी फिरकीचे तोंडभरून कौतुक करणारी असली तरी एकटय़ा मॉन्टीला जेवढे यश मिळाले तेवढेही बळी तिन्ही भारतीय गोलंदाजांना मिळवता आले नाहीत. मॉन्टीला जी लय सापडली, ती कोणत्याही गोलंदाजाला सापडली नाही आणि त्याच्या चेंडूंच्या वेगापुढे फिरकी सहजतेने खेळणाऱ्या भारतीय फलंदाजांची ससेहोलपट झाली. फक्त कुकनेच नाही तर भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानेही त्याची तोंडभरून स्तुती केली. त्यामुळे यापुढे मॉन्टीला फिरकीला पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर संघात न घेण्याची चूक कुक करणार नाही. मॉन्टीच्या पराक्रमामुळेच इंग्लंडला विजयाची पहाट दिसली आणि त्यांनी विजयाची गुढी उभारली.
कोलकात्यातही पहिल्या दिवसापासून फिरकीला पोषक खेळपट्टी असावी, असे आपल्याच चक्रव्यूहात फसल्यावरही वक्तव्य केले आहे. दुसरीकडे मॉन्टी भन्नाट फॉर्मात आहे. ‘देशवासीयांना भारतातून मालिका विजयाची नाताळ भेट देणार,’ अशी गर्जना मॉन्टीने केली आहे. मॉन्टीची ही कामगिरी काही जण फ्लूक म्हणूही शकतील, पण त्याचा जर भारतीय संघाने गंभीरपणे विचार केला नाही, तर मायदेशात मालिका पराभवाची नामुष्की आल्यावाचून राहणार नाही.    

धावफलक
भारत (पहिला डाव) : ३२७
इंग्लंड (पहिला डाव) : ४१३
भारत (दुसरा डाव) : गौतम गंभीर पायचीत गो. स्वान ६५, वीरेंद्र सेहवाग झे. स्वान गो. पनेसार ९, चेतेश्वर पुजारा झे. बेअरस्टो गो. स्वान ६, सचिन तेंडुलकर पायचीत गो. पनेसार ८, विराट कोहली झे. (बदली) रुट गो. स्वान ७, युवराज सिंग झे. बेअरस्टो गो. पनेसार ८, महेंद्रसिंग धोनी झे. ट्रॉट गो. पनेसार ८, आर. अश्विन झे. पटेल गो. पनेसार ११, हरभजन सिंग झे. ट्रॉट गो. स्वान ६, झहीर खान झे. प्रायर गो. पनेसार १, प्रग्यान ओझा नाबाद ६, अवांतर (बाइज ६, लेगबाइज ३) ९, एकूण ४४.१ षटकांत सर्व बाद १४२.
बाद क्रम : १-३०, २-३७, ३-५२, ४-६५, ५-७८, ६-९२, ७-११०, ८-१२८, ९-१३१, १०-१४२.
गोलंदाजी : जेम्स अँडरसन ४-१-९-०, मॉन्टी पनेसार २२-३-८१-६, ग्रॅमी स्वान १८.१-६-४३-४.
इंग्लंड (दुसरा डाव) : अॅलिस्टर कुक नाबाद १८, निक कॉम्प्टन नाबाद ३०, अवांतर (बाइज ८, लेगबाइज २) १०, एकूण ९.४ षटकांत बिनबाद ५८.
गोलंदाजी : आर. अश्विन ३.४-०-२२-०, प्रग्यान ओझा ४-०-१६-०, हरभजन सिंग २-०-१०-०.