इंग्लिश फुटबॉल असोसिएशनचे कार्याध्यक्ष ग्रेग डायक यांनी जागतिक फुटबॉल महासंघाच्या (फिफा) अध्यक्षपदासाठी उभे राहिलेल्या मिचेल प्लॅटिनी यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
सेप ब्लाटर यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशनचे (यूएफा) अध्यक्ष प्लॅटिनी यांनी अध्यक्षपदासाठी दावा केला. भ्रष्टाचार आणि लाचखोरीमुळे मलिन झालेली फिफाची प्रतिमा सुधारण्याचा निर्धार प्लॅटिनी यांनी व्यक्त केला आहे. डायक हे फिफाच्या कारभारावर जोरदार टीका करणाऱ्यांपैकी एक आहेत आणि त्यांनी लगेचच प्लॅटिनी यांना पाठिंबा जाहीर केला. ‘‘अध्यक्षपदासाठी मिचेल प्लॅटिनी यांना आमचा पाठिंबा असेल. त्यांच्यासोबत आमचे चांगले संबंध आहे आणि आशा करतो की, ते जगातील इतर संघटनांकडून पाठिंबा मिळवण्यास यशस्वी होतील,’’ असे मत डायक यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, ‘‘प्लॅटिनींच्या जाहीरनाम्याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत. फिफामध्ये सुधारणा करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना पाठिंबा मिळेल अशी आशा आहे. इंग्लिश फुटबॉलसाठी प्लॅटिनी यांनी सहकार्य केले आहे. येथील लीग, क्लब आणि प्रेक्षकांचा पाठिंबा याबाबत  त्यांच्याशी चर्चा केली आहे.’’
प्लॅटिनी यांना पाठिंबा जाहीर करताना निवडून आल्यावर फिफामध्ये सुधारणेसाठी समोर येणाऱ्या आव्हानांचीही कल्पना डायक यांनी करून दिली. ते म्हणाले, ‘‘या पदासाठी अनेक उमेदवार उभे राहतील. त्यामुळे प्लॅटिनींसमोरील आव्हान अधिक खडतर होईल. त्यामुळे या आव्हानांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. फिफाच्या संपूर्ण रचनेचे पुनरावलोकन करण्याची आवश्यकता आहे.’’

अध्यक्षाने समस्या सुटणार नाही – बॅच
क्वालालम्पूर : जागतिक फुटबॉल महासंघातील (फिफा) समस्या नवीन अध्यक्षाची नियुक्ती करून सुटणार नसल्याचे स्पष्ट मत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅच यांनी व्यक्त केले. बॅच यांनी मिचेल प्लॅटिनी यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीवर कोणतेही भाष्य करणे टाळले. मात्र, सर्व उमेदवारांनी पारदर्शकता जपली पाहिजे, असे ते म्हणाले.
‘‘पारदर्शकता प्रत्येक उमेदवारासाठी लागू आहे. त्याचे नियोजन योग्य रीतीने होणे गरजेचे आहे, कारण नवीन अध्यक्षाच्या नियुक्तीने फिफामधील समस्या सुटणार नाही. फिफाची रचना बदलण्याची आवश्यकता आहे आणि पारदर्शकतेतही सुधारणा व्हायला हवी,’’ असे मत बॅच यांनी व्यक्त केले.