माद्रिदचा कल्चरल लिओनेसावर ६-१ असा विजयडिएझची हॅट्ट्रिकरॉड्रिगेजचा एक गोल

रिअल माद्रिद क्लबचे प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांचा मुलगा एंझो याने वरिष्ठ स्तरावरील पदार्पण दणक्यात साजरे केले. युरोपियन विजेत्या माद्रिदकडून खेळताना एंझोने कोपा डेल रे फुटबॉल स्पध्रेत कल्चरल लिओनेसाविरुद्ध एक गोल नोंदवला. त्याला मारियानो डिएझची हॅट्ट्रिक आणि जेम्स रॉड्रिगेजच्या एक गोलची साथ लाभल्याने माद्रिदने हा सामना

६-१ असा सहज जिंकला आणि १३-२ अशा सरासरीच्या जोरावर अंतिम १६ क्लबमध्ये प्रवेश मिळवला. याउलट बार्सिलोनला अजूनही पुढील फेरीत प्रवेश करण्यासाठी कष्ट घ्यावे लागत आहेत. अव्वल ३२ संघांच्या पहिल्या लीगमध्ये बार्सिलोनला हक्र्युलस क्लबने १-१ असे बरोबरीत रोखले.

झिदान यांच्या चार मुलांमध्ये थोरल्या एंझोने रिअल माद्रिद युवा संघाकडून विविध स्थरांवर आपली छाप पाडली आहे. झिदान यांनी सामन्याच्या दुसऱ्या सत्रात एंझोला मैदानावर पाचारण केले आणि अवघ्या १७ मिनिटांत एंझोने गोल करून संघाला ४-१ अशी आघाडी मिळवून दिली. तत्पूर्वी, डिएझने पहिल्या व ४२व्या मिनिटाला आणि रॉड्रिगेझने २३व्या मिनिटाला माद्रिदसाठी गोल केले. कल्चरलच्या येराय गोंझालेजने ४५व्या मिनिटाला गोल केला. पहिल्या सत्रात माद्रिदने ३-१ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या सत्रात ६३व्या मिनिटाला एंझोने गोल करीत यात भर टाकली. त्यापाठोपाठ ८७व्या मिनिटाला डिएझने गोल करून हॅट्ट्रिक पूर्ण केली. सामन्याच्या अखेरच्या क्षणाला सेसर मोर्गाडोच्या स्वयंगोलने माद्रिदच्या विजयावर ६-१ असे शिक्कामोर्तब केले.

‘मी प्रशिक्षकाच्या भूमिकेतून बाहेर पडलो असतो तर वडील म्हणूनही मला एंझोचा अभिमान वाटला असता, परंतु तो मैदानावर खेळत असता मी त्याला प्रशिक्षकाच्या नजरेतून पाहत होतो आणि संघाच्या कामगिरीवर आनंदी आहे,’ अशी प्रतिक्रिया झिनेदिन झिदान यांनी दिली. ला लिगा फुटबॉल स्पध्रेतील बार्सिलोनाविरुद्धच्या लढतीसाठी झिदान यांनी संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे दुसऱ्या फळीतील खेळाडूंसोबत माद्रिद कल्चरल क्लबविरुद्ध खेळला आणि अपेक्षेपेक्षा अधिक चांगल्या कामगिरीची नोंद केली. या विजयामुळे माद्रिदचे मनोबल उंचावले असून बार्सिलोनाविरुद्ध हाच आत्मविश्वास त्यांच्या कामी येणार आहे.