आर्सनल आणि लिव्हरपूल यांच्यात गोलशून्य बरोबरी
इंग्लिश प्रिमियर लीगमध्ये रविवारी मँचेस्टर सिटीने एव्हर्टनवर २-० असा विजय मिळवला. तर चेल्सी संघाने वेस्ट ब्रॉमवर ३-२ गोल फरकाने निसटता विजय मिळवला. यंदाच्या हंगामात चेल्सीचा हा पहिलाच विजय ठरला. सोमवारी आर्सनल आणि लिव्हरपूल यांच्यातील उत्कंठापूर्ण लढत गोलशून्य बरोबरीत सुटली.
मँचेस्टर सिटीचा सलग तिसरा विजय
रविवारी झालेल्या सामन्यात मँचेस्टर सिटीने एव्हर्टनवर २-० असा विजय मिळवला. या विजयासह मँचेस्टर सिटीने गुणतक्त्यात अव्वल स्थानी झेप घेतली.
एव्हर्टन आणि मँचेस्टर सिटी यांनी आक्रमक खेळ करुन सुद्धा पहिल्या सत्रात गोलशून्य बरोबरीच राहिली! पंचांनी एव्हर्टनचा स्ट्रायकर लुकाकू याला ऑफसाईड ठरविले आणि त्याचा गोल नाकारण्यात आला. तसेच पहिले सत्र संपताना (४५ व्या मिनिटाला + ३) त्याची फ्री-किक क्रॉसबारवर लागली अन् त्याची आणखी एकदा गोल करायची संधी हुकलीच!
दुसऱ्या सत्रात कोलॅरव (६०व्या मिनिटाला) आणि समीर नॅसरी (८८व्या मिनिटाला) यांनी केलेल्या गोलांच्या जोरावर मँचेस्टर सिटीने एव्हर्टनवर २-० ने विजय मिळवला.
यंदाच्या हंगामात चेल्सीचा पहिला विजय
हॉथॉर्न्स येथे झालेल्या लढतीत पाहुण्या चेल्सी संघाने सामन्याच्या सुरुवातीपासून वेस्ट ब्रॉमवर वर्चस्व राखले. पण, मॅटिचने आक्रमक मध्यरक्षक मॉरिसन याला धसमुसळेपणाने रोखल्यामुळे वेस्ट ब्रॉम संघाला पेनल्टी बहाल करण्यात आली. त्यांना या सामन्यात आघाडी घ्यायची चांगली संधी मिळाली होती, पण १४व्या मिनिटाला चेल्सीचा गोलकीपर कोर्टीस याच्या उत्कृष्ट बचावामुळे मॉरिसनने पेनल्टी गमावली.
(२०व्या मिनिटाला) हॅजर्डच्या पासवर चेल्सीतर्फे पदार्पण करणाऱ्या पेड्रो रॉड्रिगेझने गोलजाळ्यात मारत खाते उघडले आणि चेल्सीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पेड्रोने दिलेल्या पासवर स्ट्रायकर दिएगो कॉस्टाने (३०व्या मिनिटाला) गोल डागत चेल्सीची आघाडी दुप्पट केली. वेस्ट ब्रॉम तर्फे मॉरिसनने (३५व्या मिनिटला) गोल करत चेल्सीची आघाडी एक गोलने कमी केली. पहिले सत्र संपायला केवळ ३ मिनिटे बाकी असताना स्ट्रायकर दिएगो कॉस्टाच्या पासवर बचावपटू सेझरने तिसरा गोल डागत सामना एकतर्फी केला.
सॉलमन रॉन्डन याला धसमुसळेपणाने रोखल्यामुळे जॉन टेरीला लाल कार्ड दाखवण्यात आले. ५४व्या मिनिटापासून म्हणजेच जवळ-जवळ संपूर्ण उत्तरार्ध चेल्सीचा संघ दहा खेळाडूंनीच खेळत होता. त्यानंतर मॉरिसनने (५९व्या मिनिटला) गोल करत चेल्सीची आघाडी पुन्हा एकदा एक गोलने कमी केली.
या दोन घटनांमुळे एकतर्फी झालेल्या सामन्यात रंगत भरली गेली. आपली तटबंदी अभेद्य करत चेल्सीने ३-२ अशी आघाडी कायम ठेवली आणि वेस्ट ब्रॉमवर दहा खेळाडूंनीशी निसटता आणि यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवला.
आर्सनल आणि लिव्हरपूल यांच्यात गोलशून्य बरोबरी
पहिल्या सत्रात आर्सनलला फारच तुरळक संधी उपलब्ध झाल्या. अशातच अ‍ॅरन रॅमझीचा गोल नाकारण्यात आल्यामुळे आर्सनल संघाची चांगलीच चीड-चीड झाली. असे झाल्यामुळे त्यांचे लक्ष विचलीत झाले आणि त्यांची एकाग्रता सुद्धा ढासळली. आर्सनलवर वर्चस्व गाजवायला लिव्हरपूल याची मदत झाली. पण, पहिल्या सत्रात वर्चस्व गाजणाऱ्या लिव्हरपूल संघाला आर्सनलचा अभेद्य बचाव न मोडता आल्यामुळे पूर्वार्धात गोलशून्य बरोबरी राहिली.
दुसऱ्या सत्रात मात्र संपूर्णतः आर्सनलचेच पारडे जड वाटत होते. पण लिव्हरपूलच्या बचावफळीने चांगली कामगिरी करताना त्यांना डोईजड होऊ दिले नाही. आर्सनल आणि लिव्हरपूल संघाना एकमेकांचा अभेद्य बचाव न मोडता आल्यामुळे ही उत्कंठापूर्ण लढत गोलशून्य बरोबरीत सुटली.
– केदार लेले (लंडन)