शनिवारी इंग्लिश प्रिमियर लीगमध्ये मॅनसिटीने आपली विजयी घोडदौड कायम राखत घरच्या मैदानावर वॉटफर्डचा २-० पराभव केला. यंदाच्या हंगामात मॅनसिटीने ४ सामन्यांतून १२ गुणांसह आपले अव्वल स्थान कायम राखले! या विजयाबरोबरच सिटीने आपल्या निकटतम प्रतिस्पर्धींवर किमान दोन ते तीन गुणांची आघाडी कायम ठेवली आहे.
क्रिस्टल पॅलेसने बलाढ्य चेल्सीचा २-१ने आणि वेस्ट हॅमने लिव्हरपूलचा ३-०ने पराभव करत धक्कादायक विजयांची नोंद केली. अटी-तटीच्या लढतींत वेस्ट ब्रॉमने स्टोकवर आणि आर्सनलने न्यूकॅसलवर १-० असा निसटता विजय मिळवला.
मॅनसिटीची विजयी घोडदौड कायम
संपूर्ण सामन्यात वर्चस्व गाजणाऱ्या मॅनसिटी संघाला वॉटफर्डचा अभेद्य बचाव न मोडता आल्यामुळे पूर्वार्धात गोलशून्य बरोबरी राहिली. संपूर्ण सामना मॅनसिटीचेच पारडे जड वाटत होते. मात्र वॉटफर्डच्या बचावफळीने चांगली कामगिरी करताना त्यांना डोईजड होऊ दिले नाही.
उत्तरार्धात मॅनसिटीचे प्रशिक्षक पेलिग्रिनि यांनी खेळाच्या रणनीतिमध्ये बदलाव आणला. नॅसरी डावीकडून, उजवीकडून डेविड सिल्वा आणि रहिम स्टर्लिंगला मध्यवर्ती खेळवायचे त्यांनी ठरवले. या व्यूहरचनेचा फायदा रहिम स्टर्लिंगला मिळाला. त्याने (४७व्या मिनिटाला) गोल डागत मॅनसिटीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या आघाडीनंतर यजमान मॅनसिटीचा आत्मविश्वास अधिक उंचावला. याय टोरेने घेतल्या फ्री-किक आणि डेविड सिल्वाच्या उत्कृष्ट पासवर फर्ननडिनोने (५८व्या मिनिटाला) गोल साधत सिटीची आघाडी दुप्पट केली.
उत्तरार्धात पहिल्या पंधरा मिनिटात झालेल्या दोन गोलमुळे पाहुण्या वॉटफर्ड संघावर चांगलेच दडपण आले. त्यामुळे बरोबरी साधण्यात किंवा सामन्यात पुनरागमन करण्यात त्यांना अपयश आले. उत्तरार्धातील आघाडी कायम ठेवत मॅनसिटीने विजयाचे तीन गुण वसूल केले.
चेल्सीचा हंगामातील दुसरा पराभव!
क्रिस्टल पॅलेसने चेल्सीला चांगलेच झुंजवले ज्यामुळे पहिल्या सत्रात गोलशून्य बरोबरी राहिली. दुसऱ्या सत्रात बलॅसीने सॅकोला दिलेल्या पासवर (६५व्या मिनिटाला) गोल साधत क्रिस्टल पॅलेसला १-० अशी आघाडी मिळवली. बदली खेळाडू म्हणून आलेल्या स्ट्रायकर फाल्कोने चेल्सीला (७९व्या मिनिटाला) १-१ अशी बरोबरी साधून दिली. पण जोएल वॉर्डने बलॅसी आणि सॅको या द्वयीने रचलेल्या संधीवर गोल साधत (८१व्या मिनिटाला) क्रिस्टल पॅलेसला पुन्हा एकदा आघाडीवर नेले. हीच आघाडी निर्णायक ठरली आणि क्रिस्टल पॅलेसने चेल्सीवर धक्कादायक विजय नोंदवला!
यंदाच्या हंगामात रडत-खडत सुरुवात करणाऱ्या चेल्सी संघाला आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे स्टॅमफर्ड ब्रिज म्हणजेच घरच्या मैदानावर प्रशिक्षक म्हणून जोसे मरिनो यांच्या लख्ख कारकिर्दीत १००व्या सामन्यात हा केवळ दुसराच पराभव ठरला! तसेच यंदाच्या हंगामात ४ लढतींमध्ये चेल्सीचा हा दुसरा पराभव ठरला. या पराभवामुळे गतविजेते चेल्सी संघ त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मँचेस्टर सिटी यांच्यापेक्षा ८ गुणांनी मागे पडला आहे.
वेस्ट हॅमचा लिव्हरपूलवर धक्कादायक विजय
तिसऱ्याच मिनिटाला अ‍ॅरन क्रेसवेलच्या क्रॉसवर गोल डागत लॅन्झिनीने वेस्टहॅमला १-० असे आघाडीवर नेले. लिव्हरपूलतर्फे पदार्पण करणाऱ्या फार्निनोचा फटका गोल पोस्ट वर आदळला आणि लिव्हरपूलची बरोबरी साधायची संधी हुकली! त्यानंतर लॅन्झिनी, सॅको आणि मार्क नोबल या त्रयीने संधी निर्माण केली. या संधीचे गोलमध्ये रुपांतर करीत मार्क नोबलने वेस्टहॅमला २ -० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. या सामन्यात अनुक्रमे लिव्हरपूलच्या कोन्तिनो आणि वेस्टहॅमच्या मार्क नोबल यांना लाल कार्ड मिळाले आणि त्यांना मैदान सोडावे लागले. फुटबॉल पंडितांच्या मते पंचांचे हे दोन्ही निर्णय चुकीचे होते असे निदर्शनास आले.
सामना संपताना इंज्युरी टाईममध्ये सॅको याने (९० + ३व्या मिनिटाला) गोल करून वेस्टहॅमच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
आर्सनलचा न्यूकॅसलवर निसटता विजय
न्यूकॅसलचा स्ट्रायकर अलेक्झांडर मित्रोविच याला (१६व्या मिनिटाला) पंचांनी लाल कार्ड दाखवून बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे न्यूकॅसलला पहिल्या सत्राच्या सुरुवातीपासूनच १० जणांसह खेळावे लागले. याचा फायदा उठवत दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच आर्सनलने केलेल्या आक्रमणात चेम्बर्लीनचा फटका न्यूकॅसलच्या कोलोचीनी अडवू शकला नाही आणि त्याचे रुपांतर स्वयंगोल मध्ये झाले. यामुळे आर्सनलला १-० अशी आघाडी मिळाली. ही आघाडी कायम राखत आर्सनलने न्यूकॅसलवर १-० असा निसटता विजय मिळवला.
आर्सनल प्रमाणेच वेस्ट ब्रॉमने स्टोकवर १-० असा निसटता विजय मिळवला.
तीन लढतींचे निकाल बरोबरीत
इतर लढतींमध्ये संडरलँडने यजमान अ‍ॅस्टन व्हिलाला २-२ असे बरोबरीत रोखले. तसेच बोर्नमथ आणि लेस्टर सिटी यांच्यातील लढत १-१ अशी बरोबरीत सुटली.
टोटनम आणि एव्हर्टन या दोन संघांतील लढत नीरस होऊन अखेर गोलशून्य बरोबरीत संपली. आपल्या संघाच्या समर्थनासाठी उपस्थित राहिलेल्या हजारो चाहत्यांची या गोलशून्य बरोबरीने चांगलीच निराशा झाली.
– केदार लेले (लंडन)