ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या आर्मीने अर्थात पोर्तुगाल संघाने युरो चषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पोर्तुगालने उपांत्यपूर्वफेरीत पोलंडचा पेनल्टी शुटआऊटमध्ये ५-३ असा धुव्वा उडवला. सामना अखेरच्या मिनिटापर्यंत रंगतदार झाला. निर्धारित वेळेत १-१ असा बरोबरीत सामना सुटल्याने पेनल्टी शुटआऊटपर्यंत पोहोचलेल्या या चुरशीच्या सामन्यात पोर्तुगालने बाजी मारली.

सामन्याच्या दुसऱयाच मिनिटाला पोलंडच्या रॉबर्ट लेवान्डोवस्कीने गोल करून पोर्तुगालला धक्का दिला होता. त्यानंतर सामन्याच्या ३३ व्या मिनिटाला पोर्तुगालच्या रिनाटो सान्चेझ याने शानदार गोल करून बरोबरी साधली. मग सामना निर्धारित वेळेत आणि अतिरिक्त वेळेत बरोबरीत सुटला.

पेनल्टी शुटआऊटमध्ये पोर्तुगालकडून रोनाल्डो,सान्चेज, नानी आणि मोटिन्यो यांनी पहिले चार गोल केले. पोलंडकडून लेवान्डोवस्की, मिलिक आणि ग्लिकने तीन गोल केले. पण पोलंडच्या ब्लाझकोवस्कीची पेनल्टी किक पोर्तुगालच्या गोलरक्षकाने थोपवली आणि पोर्तुगालच्या विजयाची संधी चालून आली. संधीचे सोने करत पोर्तुगालच्या रिकार्डो क्वारेझ्मा याने गोल करून उपांत्यफेरीचे तिकीट पक्के केले.