बेनेसचा निर्णायक गोलने १-१ अशी बरोबरी

इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पध्रेतील रविवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत लेगटन बेनेसने ८८व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या जोरावर एव्हर्टनने मँचेस्टर युनायटेडला १-१ असे बरोबरीत रोखण्यात यश मिळवले.

झाल्टान इब्राहिमोव्हिकने पहिल्या सत्रात गोल करून मँचेस्टर युनायटेडला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती, परंतु दुसऱ्या सत्रातील अखेरच्या मिनिटाला मॅरौने फेलाइनीच्या चुकीचा भरुदड युनायटेडला भरावा

लागला. फेलाईनीने पेनल्टी क्षेत्रात एड्रिसा ग्युयला पाडल्यामुळे पंचांनी एव्हर्टनला पेनल्टी बहाल केली. सामन्याच्या ८८व्या मिनिटापर्यंत ०-१ अशा पिछाडीवर असलेल्या एव्हर्टनसाठी ही चांगलीच संधी होती आणि लेगटन बेनेसने स्पॉट किकवर गोल करून युनायटेडला १-१ अशा बरोबरीवर समाधान मानण्यास भाग पाडले.

गुडिसन पार्कवर झालेला हा सामना जिंकणे युनायटेडसाठी महत्त्वाचे होते. त्यांची वाटचालही त्या दिशेने सुरू होती. सुरुवातीपासून चेंडूवर अधिक काळ ताबा मिळवीत त्यांनी आक्रमकतेवरच भर दिला होता. गुणतालिकेत ६व्या स्थानावर असलेल्या युनायटेडला ४२व्या मिनिटाला इब्राहिमोव्हिकने आघाडी मिळवून दिली. इब्राहिमोव्हिकचा पाच सामन्यांमधील हा सहावा गोल ठरला. हा गोल निर्णायक ठरेल असा वाटत होता. तत्पूर्वी, युनायटेडच्या अँडर हेरेरा आणि एव्हर्टनच्या केव्हिन मिरालास यांच्याकडून गोल करण्याचे प्रयत्न झाले. मात्र, ८५व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून आलेल्या फेलाइनीने सामन्याचे चित्र बदलले. पेनल्टी क्षेत्रात ग्युयला पाडल्यामुळे एव्हर्टनला पेनल्टी स्पॉट किक मिळाली आणि सामना बरोबरीत सुटला.