‘‘गतवर्षी अपेक्षेइतकी कामगिरी करता आली नाही़  खेळात अनेक त्रुटी निर्माण झाल्या होत्या आणि त्याकडे मी गांभीर्याने पाहिले नाही़  त्यामुळे अपयश आले, परंतु या अपयशातून मला पुन्हा शिकायला मिळाले,’’ असे मत पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणारा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने व्यक्त केल़े  मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात तो बोलत होता़  
तो पुढे म्हणाला,‘‘सरावामुळेच या उणिवांवर मात करता येते. खेळात  खूप काही तांत्रिक क्रांती होत गेली आहे. हल्लीच्या खेळाडूंना सर्व काही तयार खाद्य मिळते. एखाद्या चालीस कोणकोणत्या चालींनी उत्तर देता येते ही माहिती तुम्हाला सहज उपलब्ध होते.’’
 ‘‘कारकीर्दीत पूर्वी कोणते यश मिळविले, हे मी जाणीवपूर्वक विसरतो, त्यामुळेच मला नव्याने प्रत्येक स्पर्धेकडे सकारात्मक वृत्तीने पाहण्याची प्रेरणा मिळत़े  ’’ असे तो म्हणाला़
 ‘‘२००२ मध्ये विश्वविजेता झाल्यानंतरही मी खेळ कधी थांबविला नाही. मात्र आपण खूप मोठी कामगिरी केली आहे असे मला वाटले. त्याचा परिणाम माझ्या खेळावर झाला. विश्वविजेतेपदानंतर डॉर्टमुंड येथे झालेल्या स्पर्धेत माझी कामगिरी अतिशय वाईट झाली.  अन्य परदेशी विश्वविजेत्यांचा खेळ पाहिल्यानंतर आपल्याला अजूनही विश्वविजेतेपदे मिळवायची आहेत हेच लक्ष्य ठेवीत मी खेळत आलो आहे. ‘आराम हराम है’ असेच मी मानत आलो आहे. जोपर्यंत मी या क्षेत्रात आहे, तोपर्यंत ‘विश्रांती’ हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.’’, हे त्याने स्पष्ट केल़े

ध्येय निश्चित केल्यावरच मार्ग सापडतात
‘‘मी कधीच आत्मसंतुष्ट नाही. मला सतत वेगवेगळे ज्ञान आत्मसात करायला आवडते. जर प्रत्येक वेळी आपण नवीन ध्येय निश्चित केले तर आपोआपच त्या दृष्टीने आपल्याला ते साध्य करण्याचे मार्ग सापडतात. मी विश्वचषक स्पर्धेत तिसऱ्या प्रयत्नानंतर २००० मध्ये यशस्वी ठरलो. पहिल्या दोन प्रयत्नांत मिळालेल्या अपयशापासून मला खूप काही शिकायला मिळाले. ’’, असे आनंदने सांगितल़े