माझ्या चाहत्यांच्या प्रेमाने आणि दिलेल्या खंबीर पाठिंब्याने माझ्या डोळ्यात अश्रू दाटून आले, अशा शब्दात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज(मंगळवार) आपल्या चाहत्यांचे मनापासून आभार व्यक्त केले. निवृत्तीनंतर सचिनने पहिल्यांदाच ट्विरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संपर्क साधला.  
वयाच्या ३९व्या वर्षात एकदिवसीय सामन्यांतून निवृत्ती घेतलेल्यानंतर मास्टरब्लास्टर सध्या मसुरीत सु्ट्ट्यांचा आनंद लुटत आहे. “एवढे वर्ष तुम्ही माझ्यावर केलेले अपार प्रेम आणि मला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी शब्दही अपुरे पडतील. खास करुन गेल्या काही दिवसात मला दिलेला पाठिंबा आणि प्रतिक्रिया यांमुळे माझ्या मनाला आनंद झाला आणि त्याचवेळी डोळ्यात पाणीही आले”, असे सचिनने ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे. तसेच “उर्वरीत आयुष्यात एकदिवसीय सामन्यांतील सुवर्ण आठवणी मी जपून ठेवणार आहे, तुमचा आभारी आहे” असंही तो पुढे म्हणाला.
एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासात सचिनने सर्वाधिक १८४२४ धावा ठोकल्या आहेत. यात ४९ शतके तर ९६ अर्धशतकांचा समावेश आहे. सचिन एकूण सहा विश्वचषक खेळला आहे आणि एकदिवसीय सामन्यात व्दिशतक ठोकणारा पहिला फलंदाज आहे.