रवींद्र जडेजा हा फिरकी गोलंदाजी करताना यष्टीपासून दूर राहण्याचे यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीचे धोरण चुकीचे आहे. त्याला यापेक्षाही चांगले कौशल्य दाखविता आले असते, अशी टीका भारताचे ज्येष्ठ यष्टीरक्षक फारुख इंजिनीअर यांनी केली.
‘‘धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडला ९५ धावांनी हरविले. त्यामध्ये धोनी याच्या कुशल नेतृत्वाचा वाटा आहे यात तिळमात्र शंका नाही, मात्र जडेजाच्या गोलंदाजीप्रसंगी यष्टीपासून खूप दूर राहण्यामागचा त्याचा हेतू समजला नाही. अशी कृती काही वेळेला धोकादायक ठरू शकते. धोनीच्या शेजारीच विराट कोहली उभा राहत होता. त्या वेळी दोन यष्टीरक्षक काम करीत आहेत असेच वाटत असे; अशा प्रकारे सहसा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामन्यांमध्ये घडत नाही,’’ असेही इंजिनीअर म्हणाले.