महासंघाचे अध्यक्ष फारूख इक्बाल यांचे ठाम मत; जागतिक अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा

सिक्स पॅक अ‍ॅब्ज, एट पॅक अ‍ॅब्ज अशा प्रकारची संस्कृती पाकिस्तानमध्ये रुजलेली नाही. आमच्या देशात मोठय़ा प्रमाणात व्यायामशाळा आहेत. प्रत्येक जिल्ह्यात किमान ४०-५० तरी नक्की आहेत. पण आमच्याकडे दिखावूपणासाठी व्यायाम केला जात नाही, तर तंदुरुस्तीसाठी केला जातो, अशी माहिती पाकिस्तान शरीरसौष्ठव महासंघाचे अध्यक्ष फारूख इक्बाल यांनी दिली.

गेली दहा वष्रे संघटनेचे प्रमुखपद सांभाळणाऱ्या इक्बाल यांनी पुढे सांगितले की, ‘‘इंग्रजी आणि भारतीय चित्रपटाचाच देशात पगडा जाणवतो. गेल्या काही दिवसांत दोन्ही देशांमधील संबंध बिघडल्यामुळे भारतीय चित्रपटांची संख्या कमालीची रोडावली आहे. परंतु आमच्या देशात उत्तम शरीरसंपदा जपणारा चित्रपटाचा नायक सध्या तरी कुणी नाही.’’

जागतिक स्पध्रेत संघाच्या कामगिरीविषयी अपेक्षा व्यक्त करताना इक्बाल म्हणाले, ‘‘पाकिस्तानचे १२ खेळाडूंचे पथक या स्पध्रेत सहभागी होत आहे. प्रत्येक संघ जागतिक स्पध्रेत जेतेपदाच्या ईष्रेने उतरतो. आम्हीसुद्धा अधिकाधिक पदके जिंकण्याच्या ध्येयाने इथे उतरतो आहोत. गेल्या वर्षी बँकॉकला झालेल्या जागतिक स्पध्रेत ज्येष्ठांच्या गटात आमच्या खेळाडूला सुवर्णपदक मिळाले होते. मागील दोन दक्षिण आशियाई स्पर्धाचे यजमानपद आम्ही सांभाळले होते. या स्पर्धासहित नेपाळ, भूतानमध्ये झालेल्या काही आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्येसुद्धा पाकिस्तानी खळाडूंनी ठसा उमटवला होता. काही वर्षांच्या अंतरानंतर गेल्या काही वर्षांत पाकिस्तानी खेळाडू पदके जिंकायला लागले आहेत, ही सकारात्मक गोष्ट आहे.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘क्रीडा मंत्रालयाच्या मान्यतेने आम्ही या स्पध्रेत सहभागी झालो आहोत. पण आम्हाला या दौऱ्याचा खर्च मिळाला नसल्याने सर्व खेळाडू स्वखर्चानेच येथे आले आहेत.’’

शरीरसौष्ठवपटूंच्या रोजगाराबाबत देशातील स्थिती कशी आहे, या प्रश्नाला उत्तर देताना इक्बाल म्हणाले, ‘‘पाकिस्तानमध्ये शरीरसौष्ठवपटूंना विद्युत मंडळ, रेल्वे, पोलीस, सेनादल या ठिकाणी चांगल्या नोकऱ्या मिळतात. त्यामुळे दर्जेदार खेळाडूला नोकरीची चिंता भासत नाही.’’

देशातील खेळाची सद्यस्थिती मांडताना ते म्हणाले, ‘‘पाकिस्तानमध्ये संघटनेचे कार्य अतिशय सकारात्मक पद्धतीने सुरू आहे. छान स्पर्धा होतात, मोठय़ा प्रमाणात स्पर्धक सहभागी होतात. त्याचे शानदार संयोजन होते. या खेळासंदर्भात दोन संघटना कार्यरत असल्याने काही प्रमाणात नुकसान झाले आहे. आमच्या संघटनेला सरकारची मान्यता आहे. परंतु अन्य एक बंडखोरांची संघटना आम्हाला शह देण्याचा प्रयत्न करीत आहे. या संघटनात्मक वादांचा खेळावर आणि खेळाडूंवर परिणाम होतो.’’

‘‘माझे आईवडील अमृतसरचे असल्यामुळे भारत दौऱ्यावर जाण्याची माझी फार इच्छा आहे. २००६पासून संघटनेचे अध्यक्ष सांभाळत आहे. माझ्या दहा वर्षांच्या कारकीर्दीत एकदाही पाकिस्तानी संघाला भारतात येण्याची संधी मिळाली नाही,’’ असे इक्बाल यांनी सांगितले.

त्याघटनांमुळे खेळ बदनाम झाला!

.‘त्या’ घटनांमुळे शरीरसौष्ठव खेळ डागाळला, हे सांगताना फारूख इक्बाल गंभीर झाले. ते जडावलेल्या अंत:करणाने म्हणाले, ‘‘दोन खेळाडूंच्या मृत्यूमुळे पाकिस्तानमधील शरीरसौष्ठव क्षेत्र काही महिन्यांपूर्वी हादरले होते. यापैकी एकाला हृदयविकाराचा झटका आला, तर दुसऱ्याच्या श्वसननलिकेत बिघाड झाला. परंतु प्रसारमाध्यमांनी या दोन्ही मृत्यूंकरिता शरीरसौष्ठवला जबाबदार धरले. या खेळाडूंचा शल्यविच्छेदन अहवाल मिळाला असता तर त्याचे खरे कारण सर्वासमोर आले असते.’’

या घटनेनंतर खेळाला कशा प्रकारे सावरले, याबाबत त्यांनी सांगितले की, ‘‘संघटनेने देशभरातील व्यायामशाळांमध्ये एक आदेश जारी केला की ते कोणत्याही गैरप्रकाराला थारा देणार नाहीत. कोणत्याही खेळाडूला उत्तेजके घेण्यासाठी प्रेरित करणार नाहीत. हा प्रसार आम्ही देशभर केला. याचप्रमाणे काही डॉक्टर्स किंवा दुकानांतून दिल्या जाणाऱ्या उत्तेजक पदार्थावर त्यांनी नियंत्रण मिळवावे, अशी विनंती आम्ही सरकारकडे केली.’’