वेग ही त्याची सर्वात आवडती गोष्ट.. त्यामुळेच वेगवान गोलंदाज होण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले होते. त्यासाठी त्याने चेन्नईतील एमआरएफ पेस अकादमीमध्ये चाचणी दिली होती. अकादमीचे त्या वेळचे संस्थापक डेनिस लिली यांनी त्याला तेव्हा नापास ठरवले. पण ज्या वर्गात त्याला नापास ठरवले गेले तेथेच तब्बल २७ वर्षांनी त्याने शिकवणी दिली. ही गोष्ट आहे ती क्रिकेटच्या रणांगणातील एका जिद्दी योद्धय़ाची. गोलंदाजीत नापास झालो म्हणून हार न मानता पॅड बांधून तो मैदानात उतरला आणि अथक मेहनत, शिस्त, विजिगीषूवृत्ती यांच्या जोरावर तो महान फलंदाज झाला. २७ वर्षांनी या अकादमीमध्ये आल्यावर त्याला जुने दिवस आठवले आणि तो गहिरवला.. जुन्या आठवणींना उजाळा देत त्याने भावनांना वाट मोकळी करून दिली. ही गोष्ट आहे भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरची.
एक चांगला अष्टपैलू खेळाडू व्हावे, असे सचिनला वाटत होते. मुंबईतील सामन्यांमध्ये तो धावा करतच होता, पण गोलंदाजी नीट जमत नव्हती. वासू परांजपे यांनी तेव्हा, म्हणजे १९८७ साली त्याला अकादमीमध्ये नेले. काही चेंडू टाकल्यावर सचिनला लिली यांनी नापास ठरवले. पण तो चांगली फलंदाजी करतो, हे कळल्यावर त्याला पॅड बांधायला सांगितले आणि इतिहास घडला.. जो सर्वासमक्ष आहे.
सचिन येणार म्हटल्यावर अकादमीमध्ये चैतन्य निर्माण झाले होते. सारे खेळाडू शिस्तीत उभे होते. सचिन आला, संस्थापक ग्लेन मॅकग्राशी त्याने संवाद साधला. मैदानात कधीही हार न मानता सचिनने प्रत्येक अडथळा पार केला आणि आपली २५ वर्षांची कारकीर्द घडवली. त्याच्या या यशाचा मंत्र ऐकण्यासाठी युवा गोलंदाज आतुर झाले होते. सचिनला क्रिकेटचे वेड होते. त्याने स्वत:चा बारकाईने अभ्यास केला होता. तोच अनुभव त्याने या युवा गोलंदाजांपुढे मांडला.‘‘तुम्हीच तुमच्या खेळाचे शिल्पकार असता, त्यामुळे स्वत:वर सर्वाधिक विश्वास ठेवा. खेळ आत्मसात करायला शिका. स्वत:ची बलस्थाने आणि कच्चे दुवे हेरायला शिका आणि त्यावर मेहनत घ्या. यशाचा कुठलाही ‘शॉर्ट्कट’ नसतो, त्यासाठी मैदानात घाम गाळावाच लागतो. कारकीर्द घडवताना नेमके काय महत्त्वाचे असते, याचा विचार करा. यशाने हुरळून जाऊन नका. आज यश मिळाले तर उद्या अपयशही पदरी पडू शकते. दुखापती या खेळाडूंच्या पाचवीला पुजलेल्या असल्या तरी त्याचे योग्य व्यवस्थापन करा, त्याबद्दल जागरूक राहा,’’ असा सचिनचा सल्ला युवा गोलंदाज एकाग्रतेने ऐकत होते.
फलंदाज असो किंवा गोलंदाज, त्याचा अनुभव महत्त्वाचा असतो, हीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनुभवाची शिदोरी घेऊन सचिन या अकादमीमध्ये युवा गोलंदाजांना मार्गदर्शन करण्यासाठी आला होता. फलंदाज एका चेंडूवर बाद होतो, पण गोलंदाजाला बऱ्याच संधी असतात, असे म्हणत आपण खेळात सकारात्मक दृष्टिकोन कसा आणू शकतो, याचे धडे सचिन देत होता.
युवा खेळाडूंना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे दिल्यावर त्याने अकादमीची पाहणी केली. बऱ्याच गोष्टी बदललेल्या होत्या. त्या त्याच्या नजरेत भरल्या. नापास झाल्याचे दु:ख करत बसायचे नसते, तर प्रत्येक शेवटामागे नव्या प्रारंभाची बीजे असतात आणि हेच तब्बल २७ वर्षांनी पाहायला मिळाले. या नापास झालेल्या वर्गाचे मनोमन धन्यवाद मानत येत्या काळात या वर्गातून भारताला बरेच वेगवान गोलंदाज मिळतील, अशी अपेक्षा सचिनने व्यक्त केली.