पहिल्या दिवसापासून क्युरेटरला फिरकीला पोषक खेळपट्टी बनवण्यासाठी सांगितल्यानंतर भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी काही जणांच्या टीकेचा धनी ठरला होता. पण यात गैर काय, म्हणत या सामन्यात वेगवान गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरेल, असे मत धोनीने गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
वानखेडेवर सध्या वातावरणात आद्र्रता जास्त आहे, अन्य ठिकाणांएवढी थंडी इथे नाही. त्याचबरोबर खेळपट्टीवर चांगली उसळी आहे. त्यामुळे या सामन्यात वेगवान गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरेल. वेगवान गोलंदाजांना ‘रिव्हर्स स्विंग’ इथे चांगला मिळेल. न्यूझीलंडमध्ये खेळपट्टीवर चेंडू जास्त उसळतो, तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये वेगवान खेळपट्टय़ा आहेत. त्यामुळेच त्यांना चेंडूने फिरकी घ्यावी असे वाटत नसेल, असे धोनीने सांगितले. या वेळी शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या वीरेंद्र सेहवागबद्दल धोनी म्हणाला की, सेहवागची मानसिकता सर्वात वेगळी आहे. त्यामुळेच तो एवढी वर्षे सलामीवीराची आव्हानात्मक जबाबदारी निभावू शकला. बऱ्याचदा त्याने संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. खेळपट्टी आणि फॉर्मचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. त्याच्या मानसिकतेमुळेच तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो.