अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनल मेस्सी मैदानात ज्याप्रमाणे अफलातून खेळाचं प्रदर्शन करत प्रेक्षकांची मनं जिंकतो, त्याचप्रमाणे तो सोशल मीडियावरही अनेकांची मनं जिंकत असतो. मेस्सी नेहमीच सोशल मीडियावर विविध व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असतो. ज्यामध्ये बऱ्याचदा त्याच्या पत्नी आणि मुलांच्या फोटोचा समावेश असतो. नुकताच मेस्सीने पोस्ट केलेला एक व्हिडिओ सोशल मडियावर चर्चेत आला आहे.

मेस्सीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्याचा दोन वर्षीय मुलगा मातेओ एक गाणे गाताना दिसत आहे. मेस्सीने हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर निरागस मातेओच्या या गाण्यावर अनेकांनीच कमेंट्स करण्यास सुरुवात केली. यामध्ये सर्वाधिक लक्षवेधी कमेंट ठरली ती म्हणजे गेरार्ड पिक या खेळाडूची. गेरार्डने या व्हिडिओवर,’कॅटलोनियामध्ये कधीही मुलांना जिन पेतित क्वी डेन्स… (हे बालगीत) शिकवण्यावर निर्बंध नाहीत’ अशी उपरोधिक कमेंट केली. या माध्यमातून गेरार्डने अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं.

वाचा : अंमली पदार्थाचा अल्पवयीन मुलांना विळखा

स्पेनमधील पूर्वेकडच्या कॅटलोनिया या समृद्ध प्रांताला स्वातंत्र्य हवे आहे. त्यासाठी नुकताच जनमताचा कौल घेण्यात आला. त्याचविषयी पिकने ही कमेंट केली. त्याने कधीही स्वातंत्र्याला पाठिंबा दिला नाही. पण, याविषयी त्याने बऱ्याचदा गोंधळवून टाकणारी विधानेही केली होती. कॅटलोनिया या प्रांताला स्वातंत्र हवे असण्याच्या मुद्द्यावरुन जनमताचा कौल घेण्यात आला. त्यामुळे स्पेनमध्ये राजकीय पटलापासून ते फुटबॉलच्या मैदानावरही याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळालं.