*   दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा १० विकेट राखून दणदणीत विजय
*   इंग्लंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली
*   पनेसार-स्वानच्या फिरकीपुढे भारताची घसरगुंडी
*   पनेसारचे सामन्यात २१० धावांत ११ बळी
*   शानदार शतकी खेळी साकारणारा केव्हिन पीटरसन सामनावीर

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर इंग्लिश संघ आधीपासूनच कमालीचा आशादायी होता. २००६चा इतिहास इंग्लंड संघाच्या गाठीशी होता. त्यात भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने इंग्लिश संघाला नतमस्तक करण्यासाठी खेळपट्टी पहिल्या दिवसापासून फिरकी गोलंदाजीला अनुकूल ठरायला हवी, असे फर्मान काढले. वानखेडेवर आर. अश्विन, प्रग्यान ओझा आणि हरभजन सिंग या जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांसह आपण इंग्लंडवर चाल केली, पण मॉन्टी पनेसार आणि ग्रॅमी स्वान यांच्या फिरकीचा प्रतिहल्ला भारताला भारी पडला. त्यांचे वेगाने वळणारे चेंडू भारतीय फलंदाजांना कळण्याच्या आतच पंचाचे बोट उंचावले जायचे. इंग्लिश संघाला कसोटी मालिकेत ४-० अशा फरकाने पराभव करून सूड घेण्याचे भारताचे स्वप्न वानखेडेवर आता मातीमोल ठरले आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी उपाहाराच्या ४३ मिनिटे आधीच इंग्लंडने १० विकेट राखून आरामात विजय साजरा केला. याशिवाय चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधून आता इंग्लिश संघ आत्मविश्वासाने कोलकात्याला रवाना होणार आहे.
भारताच्या दुसऱ्या डावात गौतम गंभीरचा (६५) अपवाद वगळता कोणत्याही फलंदाजाला पनेसार-स्वानच्या फिरकीसमोर टिकाव धरता आला नाही. डावखुरा फिरकी गोलंदाज पनेसारने दुसऱ्या डावात ८१ धावांत ६ बळी घेतले, तर ऑफ-स्पिनर स्वानने ४३ धावांत ४ बळी घेतले. पनेसारने या कसोटीत २१० धावांत ११ बळी घेतले, तर स्वानने ११३ धावांत ८ बळी घेतले. या दोन्ही फिरकी गोलंदाजांनी मिळून या सामन्यात एकूण १९ बळी घेतले आहेत. यावरूनच इंग्लिश संघाला वानखेडेच्या फिरकीचे गुपित किती चांगले अवगत झाले, याचा प्रत्यय येतो. भारतीय मैदानांवर आपली सातत्यपूर्ण छाप पाडणाऱ्या केव्हिन पीटरसनने या कसोटीत १८६ धावांची लाजवाब खेळी साकारून सामनावीर पुरस्काराचा मान मिळवला.
भारताचे ५७ धावांचे तुटपुंजे आव्हान अॅलिस्टर कुक (नाबाद १८) आणि निक कॉम्प्टन (नाबाद ३०) जोडीने ९.४ षटकांत आरामात पार केले. त्यानंतर इंग्लिश संघाने जल्लोष साजरा केला. ‘‘सामना अजूनही संपलेला नाही. चमत्कार होऊ शकतो,’’ ही गौतम गंभीरने रविवारी दाखवलेली आशा फोल ठरली.    

दुसऱ्या कसोटी सामन्याचे प्रगती पुस्तक

पास! 
*गौतम गंभीर
दुसऱ्या डावात झुंजार अर्धशतक.

* चेतेश्वर पुजारा

अहमदाबादपाठोपाठ मुंबईतही शानदार शतक

* प्रग्यान ओझा
पहिल्या डावात इंग्लंडचे पाच बळी.

 

 

नापास !
*महेंद्रसिंग धोनी : पहिल्या दिवसापासूनच फिरकीला साथ देणारी खेळपट्टी हवी, हा निर्णय अंगलट आला तरी धोनी अजून आपल्या भूमिकेवर ठाम आहे. पाटा खेळपट्टीवर नाणेफेक जिंकल्यावर ३-४ दिवस फलंदाजी करण्यात काहीच अर्थ नाही. त्यापेक्षा कसोटी निर्णायक ठरविणाऱ्या खेळपट्टय़ा योग्य ठरतात. जो संघ चांगली कामगिरी बजावेल, तो जिंकणारच. आता कोलकात्यालासुद्धा अशाच प्रकारची खेळपट्टी राखण्याचा आग्रह धोनीने केला आहे. त्यामुळे ५ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याविषयीही उत्सुकता निर्माण झाली आहे. हा धोनी दुसऱ्या कसोटीच्या दोन्ही डावांत अनुक्रमे २९ आणि ६ धावा करू शकला, तर अहमदाबाद कसोटीत त्याला फक्त पहिल्या डावात ५ धावा काढता आल्या होत्या. त्यामुळे धोनीचा फॉर्म हासुद्धा चिंतेची बाब ठरत आहे.

* वीरेंद्र सेहवाग : आपल्या कारकीर्दीमधील १००व्या कसोटी सामन्यात खेळणाऱ्या सेहवागकडून पदार्पणाप्रमाणेच शतकाची अपेक्षा करण्यात येत होती, परंतु अहमदाबाद कसोटीत शतक झळकावणारा वीरू दुसऱ्या कसोटीत अनुक्रमे ३० आणि ९ धावाच करू शकला.

* सचिन तेंडुलकर : काही दिवसांपूर्वी रणजीमध्ये दिमाखदार शतक झळकावून साक्षात सुनील गावस्करकडून पाठ थोपटवून घेणारा सचिन तेंडुलकर घरच्या मैदानावर अपयशी ठरला. दोन्ही डावांमध्ये प्रत्येकी ८ धावांवर सचिनला पनेसारनेच बाद केले. घरच्या मैदानावरील सचिनचे अपयश हे टीकाकारांना संधी देणारे ठरते. सचिनने आपल्या भविष्याबाबत निवड समितीशी सल्लामसलत करावी, असा त्वरित सल्ला द्यायला गावस्कर विसरले नाहीत. त्यामुळे वानखेडेवरील ही त्याची अखेरची कसोटीच ठरण्याची चिन्हे आहेत.

* आर. अश्विन :  अश्विनचे अपयश हे भारतासाठी या कसोटीत महत्त्वाचे ठरले. पहिल्या डावात ४२.३-६-१४५-२ आणि दुसऱ्या डावात ३.४-०-२२-० असे गोलंदाजीचे पृथक्करण राखणाऱ्या अश्विनकडून भारताच्या मोठय़ा अपेक्षा होत्या, परंतु बळी मिळवण्यासाठी त्याला झगडावे लागत होते. मात्र पहिल्या डावात साकारलेली ६८ धावांची खेळी अश्विनच्या अष्टपैलुत्वाला न्याय देणारे ठरते.

* विराट कोहली :   पाचव्या स्थानावर फलंदाजीला उतरणाऱ्या कोहलीला व्हीव्हीएस लक्ष्मणच्या स्थानाला न्याय देता आला नाही. अनुक्रमे १९ आणि ७ धावा काढणारा कोहलीने अजून कसोटी क्रिकेट गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. अहमदाबाद कसोटीतही त्याला १९ आणि नाबाद १४ धावा काढता आल्या होत्या.

* युवराज सिंग : मधल्या फळीतील फलंदाज युवराजने अहमदाबाद कसोटीत अर्धशतक झळकावून आपले पुनरागमन साजरे केले होते. पण दुसऱ्या कसोटीत तो फक्त ० आणि ८ धावाच करू शकला.

 

* हरभजन सिंग : इंग्लंडविरुद्ध तीन फिरकी गोलंदाजांची चाल भारताने रचली म्हणून हरभजनला ९९वा कसोटी सामना खेळायची संधी मिळाली. पण तो या संधीला पुरता न्याय देऊ शकला नाही. पहिल्या डावात ७४ धावांत २ बळी आणि दुसऱ्या डावात १० धावांत एकही बळी न मिळवू शकणाऱ्या हरभजनकडून मोठय़ा अपेक्षा करण्यात येत होत्या.

* झहीर खान : झहीर या अनुभवी वेगवान गोलंदाजाला भारताने दुसऱ्या कसोटीत का खेळवावे, या प्रश्नाचे साधे उत्तर म्हणजे एक तरी वेगवान गोलंदाज दिमतीला असावा म्हणून. त्याने पहिल्या डावात १५ षटके गोलंदाजी केली, पण एकही बळी तो मिळवू शकला नाही.