झरेव्हचा सरळ सेट्समध्ये धुव्वा; वॉवरिन्काची सोंगावर सरशी; व्हीनस, वँडेवेघे उपांत्य फेरीत

वय हा निव्वळ आकडा असून, वाढत्या वयाबरोबर दर्जा, सातत्य आणि तंदुरुस्ती या तिन्ही आघाडय़ांवर स्वत:ला सिद्ध करणाऱ्या ३५ वर्षीय रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत त्याचा मुकाबला मित्र स्टॅन वॉवरिन्काशी होणार आहे. वॉवरिन्काने जो विलफ्रेड सोंगाचे आव्हान मोडून काढत उपांत्य फेरी गाठली. महिला गटात अनुभवी व्हीनस विल्यम्सच्या बरोबरीने कोको व्हँडेवेघेने उपांत्य फेरी गाठण्याचा पराक्रम केला.

१८व्या ग्रॅण्ड स्लॅम जेतेपदासाठी उत्सुक फेडररने झरेव्हला ६-१, ७-५, ६-२ असे सरळ सेट्समध्ये नमवले. झरेव्हने शेवटच्या लढतीत जागतिक क्रमवारीत अव्वल आणि अव्वल मानांकित अ‍ॅण्डी मरेला हरवण्याची किमया केली होती. मात्र फेडररच्या घोटीव खेळासमोर तो निष्प्रभ ठरला. या स्पर्धेची चार जेतेपदे नावावर असणाऱ्या फेडररने १३व्यांदा उपांत्य फेरीपर्यंत मजल मारण्याचा विक्रमही केला. फेडररसाठी ही ४१वी विक्रमी ग्रॅण्ड स्लॅम उपांत्य फेरीची लढत असेल.

‘काही फेऱ्या जिंकू शकेन, असे वाटले होते. मात्र मी चांगला खेळ करत उपांत्य फेरी गाठून स्वत:लाच चकित केले आहे. स्टॅनविरुद्धच्या लढतीसाठी आतुर झालो आहे,’ अशा शब्दांत फेडररने आपल्या भावना व्यक्त केल्या.

वॉवरिन्काने सोंगाचे आव्हान ७-६ (७-२), ६-४, ६-३ असे मोडून काढत वाटचाल केली. तीन ग्रॅण्ड स्लॅम जेतेपदे नावावर असणाऱ्या वॉवरिन्काचा मुकाबला बलाढय़ फेडररशी होणार आहे.

कारकीर्दीच्या उत्तरार्धात खेळ उंचावणाऱ्या अनुभवी व्हीनस विल्यम्सने अ‍ॅनास्तासिआ पॅव्हल्युचेनकोव्हाचा ६-४, ७-६ (३) असा पराभव केला. या विजयासह ३६ वर्षीय व्हीनसने कारकीर्दीत पहिल्यांदाच या स्पर्धेत उपांत्य फेरीत स्थान पटकावले.

अन्य लढतीत अमेरिकेच्या बिगरमानांकित कोको व्हॅण्डेवेघेने सातव्या मानांकित गार्बिन म्युगुरुझाचा ६-४, ६-० असा धुव्वा उडवला.

सानिया, रोहन समोरासमोर

सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा मिश्र प्रकाराच्या उपांत्यपूर्व फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. द्वितीय मानांकित सानिया आणि इव्हान डोडिग जोडीने सैसाई झेंग आणि अलेक्झांडर पेया जोडीवर २-६, ६-३, १०-६ असा विजय मिळवला. रोहन आणि गॅब्रिएला डाब्रोव्हस्की जोडीने पाचव्या मानांकित यंग जॅन चान आणि ल्युकाझ क्युबोट जोडीवर ६-४, ५-७, १०-३ अशी मात केली.