जेतेपदासाठी शर्यतीत असणाऱ्या रॉजर फेडरर आणि अँडी मरे यांनी विम्बल्डन टेनिस स्पर्धेत तिसऱ्या फेरीत सहज वाटचाल केली. महिलांमध्ये गतविजेत्या पेट्रा क्विटोव्हा, अँजेलिक्यू कर्बर, अ‍ॅग्निझेस्का रडवानस्का यांनी विजयी आगेकूच केली. मात्र मानांकित अ‍ॅना इव्हानोव्हिकला अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले.
कारकीर्दीतील विक्रमी १८व्या ग्रँडस्लॅमसाठी प्रयत्नशील फेडररने गतवैभवाला साजेसा खेळ करताना सॅम क्वेरीवर ६-४, ६-२, ६-२ असा विजय मिळवला. उंचपुऱ्या क्वेरीला रोखण्यासाठी दोन पायांच्या मधून फेडररने खेळलेला लॉबचा फटका चर्चेचा विषय ठरला. अ‍ॅमेली मॉरेस्मोच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या अँडी मरेने रॉबिन हासचा ६-१, ६-१, ६-४ असा पराभव केला. ३५ अंश सेल्सियस वातावरणाचा खेळावर परिणाम होऊ न देता मरेने शानदार खेळ करत विजय साकारला.
जेतेपद आपल्याकडेच राखण्यासाठी आतूर पेट्रा क्विटोव्हाने जपानच्या कुरुमी नाराचा ६-२, ६-० असा धुव्वा उडवला. दहा बिनतोड सव्‍‌र्हिसच्या बळावर पेट्राने दिमाखदार विजय मिळवला. अ‍ॅग्निझेस्का रडवानस्काने टॉमलीजॅनोव्हिकचे आव्हान ६-०, ६-२ असे संपुष्टात आणले. दुहेरीची विशेषज्ञ आणि एकेरीच्या क्रमवारीत १५८व्या स्थानी असलेल्या बेथानी मॅटेक सँड्सने अ‍ॅना इव्हानोव्हिकवर ६-३, ६-४ असा सहज विजय मिळवला. सिमोन हालेप आणि इग्युेन बुचार्ड यांच्यापाठोपाठ अ‍ॅनालाही माघारी परतावे लागले.
अ‍ॅनाने २००८मध्ये फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावत कारकीर्दीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम जेतेपदावर कब्जा केला होता. मात्र ऐतिहासिक विजयानंतर अ‍ॅनाला आपल्या कामगिरीत सातत्य राखता आले नाही. फॉर्ममध्ये सातत्याने घसरण आणि दुखापती यामुळे अ‍ॅनाला ग्रँडस्लॅम स्पर्धामध्ये बहुतांशी वेळा प्राथमिक फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागतो. यंदा विम्बल्डन स्पर्धेत बिगरमानांकित आणि एकेरीचा अनुभव नसलेल्या खेळाडूकडून तिचा पराभव झाला. या पराभवामुळे अ‍ॅनाच्या टेनिस भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कॅरोलिन वोझ्नियाकीने संघर्षपूर्ण लढतीत डेनिसा अलटरेव्हाला नमवत तिसरी फेरी गाठली. कॅरोलिनने डेनिसावर ६-१, ७-६ (८-६) असा विजय मिळवला. पुढच्या फेरीत कॅरोलिनची लढत इटलीच्या कॅमिला जॉर्जी हिच्याशी होणार आहे. दहाव्या मानांकित अँजेलिक्यू कर्बरने आंद्रेआ पॅव्हल्युचेनकोव्हावर ७-५, ६-२ असा विजय मिळवला.