गोविंदराज गटाला मान्यता देण्याची विनंती

भारतात बास्केटबॉल संघटनांमध्ये सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल महासंघाने (फिबा) पुढाकार घेतला आहे. भारतीय बास्केटबॉल महासंघात (बीएफआय) निर्माण झालेली दुफळी नष्ट करण्यासाठी गोविंदराज प्रमुख असलेल्या संघटनेला लवकरात लवकर मान्यता देऊन या वादावर पडदा पाडावा, अशी विनंती फिबाने केंद्रीय युवा कल्याण व क्रीडा मंत्रालयाकडे केली आहे. त्यामुळे हा वाद लवकर मिटण्याची शक्यता आहे.

गोविंदराज गटाने २७ मार्च रोजी घेतलेली निवडणूक अधिकृत होती, अशी माहिती फिबाचे सरचिटणीस पॅट्रिक बाउमॅन्न यांनी क्रीडामंत्री सरबानंद सोनोवाल यांना दिली. तसेच प्रतिस्पर्धी संघटना त्यांच्याशी निगडित असलेल्या राज्य संघटनांची व खेळाडूंची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही या वेळी पॅट्रिक यांनी केला. फिबाने २३ मे रोजी गोविंदराज

प्रमुख असलेल्या बीएफआयला मान्यता दिली असून पूनम महाजन गटाला विरोध दर्शविला होता, असेही पॅट्रिक म्हणाले.

‘‘चार महिन्यांपूर्वी भारतातील बास्केटबॉल संघटनांमधील या वादावर चिंता व्यक्त केली होती. बीएफआयची स्थिती अत्यंत नाजूक आणि देशातील बास्केटबॉल विकासाला खीळ बसविणारी आहे. गोविंदराज यांच्या अधिकृत नियुक्तीनंतर पुण्यात झालेल्या बैठकीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंधित असलेल्या सदस्यांनी आमच्याकडे प्रतिस्पर्धी गटाबाबत तक्रार केली होती. त्यांनी प्रतिस्पर्धी गट बीएफआय किंवा फिबा यांनी आयोजित केलेल्या स्पर्धामध्ये खेळाडू आणि राज्य संघटनांना सहभाग घेण्यास मज्जाव करीत असल्याचे पुरावे सादर केले आहेत,’’ अशी माहिती पॅट्रिक यांनी दिली.