भ्रष्टाचारासंदर्भात फिफाच्या पदाधिकाऱ्यांवर झालेली अटकेची कारवाई गंभीर मुद्दा आहे. त्यामुळे फिफाच्या अध्यक्षीय निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी युरोपीय फुटबॉल महासंघाने केली आहे. युरोपा लीग स्पर्धेच्या अंतिम लढतीच्या पाश्र्वभूमीवर युरोपीय महासंघाच्या कार्यकारिणी समितीची बैठक झाली. त्यामध्ये या मुद्दय़ावर चर्चा झाली. झुरिच, स्वित्र्झलड येथे होणारी फिफाची बैठक रद्द करण्यात यावी आणि अध्यक्षपदाची निवडणूक सहा महिन्यांच्या कालावधीत घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
फिफाच्या पदाधिकाऱ्यांवर झालेली कारवाई फुटबॉलविश्वाला कलंक आहे. ब्लाटर यांचे नेतृत्व त्यासाठी कारणीभूत आहे. फिफाच्या प्रतिमेला या घटनेमुळे तडा गेला आहे. फिफाची पुनर्रचना करण्याची वेळ आली आहे, अशी भूमिका युरोपीय महासंघाने घेतली आहे.